पीटीआय, गॉल

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील वर्चस्वानंतरही भारतीय संघ अलीकडे कसोटी क्रिकेटमधील आपले अस्तित्व हरवून बसल्यासारखे चित्र समोर आले आहे. लागोपाठ दोन मालिकेत सपशेल पराभव पत्करावा लागल्यानंतर आता नव्याने कसोटी क्रिकेटच्या मंचावर श्रीलंकेत पुनरागमन करताना भारतीय संघाच्या सर्वांगीण क्षमतेची कसोटी लागणार आहे.

फिरकी गोलंदाजांना साथ देणार्‍या खेळपट्टीसह अनुकूल हवामानात भारताच्या पलंदाजांचीच नाही, तर फिरकी गोलंदाजांची देखील परीक्षा बघितली जाईल. येथील हवेचा स्त्रोत पाहता फिरकी गोलंदाजांना आपल्या चेंडूच्या गती आणि फिरकीवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. श्रीलंकेचे गोलंदाज याच हवामानात खेळत असल्यामुळे त्यांना त्याची सवय आहे. पण, भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांना या हवामानाशी जुळवून घ्यावे लागणार आहे. भारतीय संघ या परिस्थितीशी किती झटपट समरस होतो, यावर त्यांचे यशापयश अवलंबून राहील यात शंका नाही.

श्रीलंकेत भारताने यापूर्वी सलग पाच कसोटी सामने जिंकले असले तरी नजिकच्या काळात भारताने मायदेशातील आपल्या गेल्या तीन मालिकांपैकी दोन मालिका गमावल्या आहेत. केवळ याच कारणामुळे ते अशा देशात निश्चित अतिशय प्रबळ दावेदार नसतील.

कसोटी सामन्यांचे दुर्भिक्ष

भारतीय संघ सध्या नाही म्हटले तरी बदलाच्या टप्प्यातून जात आहे, तर दुसरीकडे श्रीलंका संघ कसोटी क्रिकेटमध्ये जवळपास विजनवासात असल्यासारखा आहे. भारताने या वर्षात आतापर्यंत अवघी एकच कसोटी खेळणे ही एक दुर्मिळ गोष्ट आहे, परंतु श्रीलंकेने गेल्या १३ महिन्यांत केवळ दोनच कसोटी सामने खेळणे हा आता एक नियमच बनला आहे. गेल्या आठ वर्षांत त्यांनी दोनपेक्षा जास्त कसोटी सामन्यांच्या केवळ दोनच मालिका खेळल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांकडून काय अपेक्षा ठेवाव्यात, हे सांगणे कठीण आहे. श्रीलंका दोन्ही बाजूंनी भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकतील अशा दोन फिरकीपटूंची जोडी मैदानात उतरवण्यासाठी उत्सुक असेल, तर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध अशाच प्रकारच्या फिरकीला अनुकूल परिस्थितीत झालेल्या मालिकांमधील पराभवानंतर जोरदार पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असेल.

प्रथम फलंदाजी निर्णायक

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारणे याकडेच दोन्ही संघांचा कल राहील, जेणेकरून खेळपट्टी फिरकीपटूंना अधिक मदत करू लागण्यापूर्वी धावा फलकावर असतील; कारण श्रीलंकेमध्ये सहसा असेच घडते. खेळपट्टी प्रथम फलंदाजांना पूर्ण साथ करते आणि नंतर ती फिरकीच्या आहारी जाते. पथुन निसांकाच्या अनुपस्थितीत, धनंजया डी सिल्वा, कमिंदू मेंडिस आणि दिनेश चंडिमल यांनाच फलंदाजीची मुख्य जबाबदारी सांभाळावी लागेल. पहिल्या कसोटीत तेथील परिस्थितीशी जुळवून घेताना अचानक अडचणीत येणे भारतीय फलंदाजांना नक्कीच टाळावे लागेल. के.एल. राहुल, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल यांना ही जबाबदारी पार पाडावी लागेल.

असा एक ऐतिहासिक क्षण

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना गॉल येथे सुरू होईल, तेव्हाच कसोटी क्रिकेटच्या इतिहासाचे नवे पान लिहिले जाईल. भारताचा हा सहाशेवा कसोटी सामना असेल आणि इतके सामने खेळणारा भारत हा तिसरा संघ ठरेल. त्याचवेळी गॉलच्या मैदानावरील हा पन्नासावा सामना असेल. पन्नास कसोटी सामन्यांचे आयोजन करणारे गॉल हे आशियातील पहिले मैदान ठरेल.

गोलंदाजांना लय आवश्यक

भारतीय संघ येथे कुलदीप यादव, मानव सुथार आणि रवींद्र जडेजा या तीन डावखुर्‍या फिरकीपटूंसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे आणि त्यांना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. गॉलची खेळपट्टी सुरुवातीला फारशी फिरकीला मदत करणारी नसेल, परंतु सामना जसा पुढे जाईल तशी ती नैसर्गिकरित्या फिरकीला साथ देईल. त्यामुळे गोलंदाजांना त्यांच्या कौशल्यावर विश्वास ठेवून अचूक टप्पा आणि दिशा शोधावी लागेल. येथे फिरकीपटू अधिक षटके टाकतील, परंतु मुख्य वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांच्यावर धावा रोखण्याची जबाबदारी राहील.

गिल म्हणाला…

’उत्कृष्टता केंद्रात दुखापतीतून सावरत असलेल्या खेळाडूंच्या प्रगतीवर संघ व्यवस्थापनाचे  लक्ष

’खेळाडूच्या दृष्टीकोनातून भविष्याचा विचार करताना, कठोर निर्णय घ्यावा लागतो

’प्रमुख खेळाडू जायबंदी असल्याचा संघाच्या मानसिकतेवर कसलाच परिणाम नाही. तरुण खेळाडू संघासाठी मोलाचे योगदान देतील

’प्रमुख खेळाडूंना श्रीलंका क्रिकेट एकादश विरुद्ध झालेल्या सामन्यात स्थानिक परिस्थितीचा अनुभव घेण्याची संधी मिळाली.

’सिराजसह प्रसिध कृष्णा नवीन चेंडूने गोलंदाजीची सुरुवात करेल

’बुमराच्या अनुपस्थितीत प्रसिध आणि गुरनूर ब्रार सारख्या गोलंदाजांसाठी आपल्या खेळाचा स्तर उंचावण्याची उत्तम संधी

वेळ : सकाळी १० वाजता 

थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन १, , सोनी लिव्ह ॲप.