Manav Suthar Record In India vs SrilankaTest: गॉलच्या मैदानावर भारताचा युवा फिरकी गोलंदाज मानव सुथारच्या फिरकी गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांदरम्यान पार पडलेल्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेला विजयासाठी ३७२ धावा करायच्या होत्या. पण श्रीलंकेचा संपूर्ण डाव अवघ्या २०६ धावांवर आटोपला. यादरम्यान मानव सुथारने पहिल्या डावात गोलंदाजी करताना ४ आणि दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना ६ गडी बाद केले. दोन्ही डावात मिळून १० गडी बाद करताच मानव सुथारने भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी केली आहे, जी आजवर कुठल्याही गोलंदाजाला करता आली नव्हती.
अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज
मानव सुथारला अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. पहिल्याच सामन्यात दमदार गोलंदाजी करुन त्याने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला होता. आता श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही मानव सु्थारच्या फिरकीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने ७६ धावा खर्च करुन सर्वाधिक ४ आणि तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना ६६ धावा खर्च करुन सर्वाधिक ६ गडी बाद केले. यासह त्याने दोन्ही डावात मिळून १० गडी बाद केले. या कामगिरीसह त्याने एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. मानव सुथार हा परदेशात गोलंदाजी करताना १० गडी बाद करणारा सर्वात युवा भारतीय फिरकी गोलंदाज ठरला आहे.
याआधी अनेक भारतीय फिरकी गोलंदाजांनी परदेशात गोलंदाजी करताना एका सामन्यात १० गडी बाद केले आहेत. पण या यादीत आता मानव सुथारचं नाव सर्वात आघाडीवर असणार आहे. त्याने वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी हा पराक्रम केला आहे. या डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाचा सामना करताना श्रीलंकेचे फलंदाज संघर्ष करताना दिसून आले. दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेकडून सोनल दिनूशा टिचून फलंदाजी करत होता. पण मानव सुथारने त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं आणि श्रीलंकेच्या विजयाच्या आशा मावळल्या.
भारतीय संघाचा दमदार विजय
गॉलच्या मैदानावर पार पडलेला हा सामना भारतीय क्रिकेट इतिहासातील ६०० वा कसोटी सामना होता. या सामन्यात भारतीय कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना देवदत्त पडिक्कलच्या १६७ आणि केएल राहुलच्या ८२ धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ४६२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेकडून सोनलने १०० आणि निरोशन डिकवेलाने ८० धावांची खेळी करुन श्रीलंकेची धावसंख्या २८४ धावांपर्यंत पोहोचवली. या डावात भारतीय संघाने मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात भारतीय संघाचा डाव अवघ्या १९३ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने श्रीलंकेसमोर विजयासाठी ३७२ धावांचे आव्हान ठेवले. पण श्रीलंकेचा डाव २०६ धावांवर आटोपला.
