Yashasvi Jaiswal Unwanted Record: गॉलच्या मैदानावर भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आतापर्यंत भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. गोलंदाज आणि फलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे. पण, सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या डावात ३२ धावांवर धावबाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात तो शून्यावर माघारी परतला आहे. या डावात शून्यावर बाद होताच त्याच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.

यशस्वी जैस्वालने गेल्या काही सामन्यांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. वनडे क्रिकेटमध्ये संधी मिळताच त्याने संधीचं सोनं केलं. श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करतानाही त्याला चांगली सुरुवात मिळाली होती. पण केएल राहुलच्या एका चुकीमुळे त्याला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर तो यष्टीरक्षकाच्या हातून झेलबाद होऊन माघारी परतला. असिथा फर्नांडोने टाकलेला ऑफ साईडच्या चेंडूवर जैस्वालने कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात तो यष्टीरक्षक निरोशन डिकवेलाच्या हातून झेलबाद होऊन माघारी परतला.

जैस्वालच्या नावे नकोसा रेकॉर्ड

या डावात शून्यावर बाद होताच जैस्वालच्या नावे नकोसा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. जैस्वाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होणाऱ्या सलामीवीर फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा फलंदाज झॅक क्रॉली अव्वल स्थानी आहे. झॅक क्रॉली आतापर्यंत १० वेळा शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे. तर रॉरी बर्न्स आणि महमुदूल हसन जॉय ८ वेळा शून्यावर बाद होऊन माघारी परतले आहेत. तर क्रेग ब्रेथवेट, टॉम लॅथम, डेव्हिड वॉर्नर आणि आता यशस्वी जैस्वाल हे फलंदाज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ७ वेळा शून्यावर माघारी परतला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होणारे फलंदाज

१० वेळेस- झॅक क्रॉली
८ वेळेस- रॉरी बर्न्स, महमुदूल हसन जॉय
७ वेळेस- क्रेग ब्रेथवेट, टॉम लॅथम, डेव्हिड वॉर्नर आणि यशस्वी जैस्वाल