IND vs SL 2nd ODI Match Sri Lanka beat India : भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना खूपच रोमांचक झाला, ज्यामुळे यजमान श्रीलंकेने पाहुण्या टीम इंडियाचा ३२ धावांनी दारुण पराभव केला. या सामन्यात भारताचे फलंदाज जेफ्री व्हँडरसेसमोर सपशेल लोटांगण घालताना दिसले. जेफ्री व्हँडरसेने ६ विकेट्स घेत श्रीलंकेच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला २४१ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला भारतीय संघ २०८ धावांत गारद झाला. ज्यामुळे श्रीलंकेच्या संघाला तब्बल ३ वर्षांनंतर भारताला वनडे सामन्यात पराभूत करण्यात यश आले आहे. त्याचबरोबर यजमान संघाने मालिकेत १-० शी आघाडी घेतली आहे.

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २४१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या गड्यासाठी ९७ धावांची भागीदारी झाली. दरम्यान कर्णधार रोहितने २९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. रोहितने आपल्या खेळीत ४४ चेंडूत ६४ धावा केल्या, त्यादरम्यान त्याने ५ चौकार आणि ४ षटकारही मारले. तर गिलने ३५ धावांचे योगदान दिले. त्यांच्या ९७ धावांच्या भागीदारीनंतर विकेट पडण्यास सुरुवात झाली.

टीम इंडियाने अवघ्या ५० धावांत ६ विकेट्स गमावल्या –

एकेकाळी भारतीय संघाने एकही विकेट न गमावता ९७ धावा केल्या होत्या, मात्र रोहित शर्माची विकेट पडल्यानंतर टीम इंडियाचे फलंदाज ठराविक अंतराने आऊट होत राहिले. गिलही कर्णधारानंतर लगेच तंबूत परतला. यानंतर शिव दुबे चार चेंडूंत एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहलीला ११ धावांच्या स्कोअरवर जीवदान मिळाले होत, पण तो केवळ ३ धावांनंतर म्हणजेच १४ धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल अनुक्रमे ७ धावा आणि शून्यावर बाद झाले. अशाप्रकारे एकही विकेट न गमावता भारताची धावसंख्या १ बाद ९७ धावांवरुन ६ बाद १४७ अशी झाली. अवघ्या ५० धावांच्या आत ६ विकेट्स गमावल्याने टीम इंडिया अडचणीत आली होती. यानंतर अक्षर पटेलने ४४ धावांची खेळी नक्कीच खेळली, पण तोही भारताचा पराभव जास्त काळ टाळू शकला नाही. अशा प्रकारे टीम इंडियाचा डाव ४२.२ षटकांत २०८ धावांवर गारद झाला. श्रीलंकेकडून जेफ्री व्हँडरसेने ६ आणि चरित असलंकाने ३ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – Indian Hockey Team : हॉकीच्या मैदानात सौरव गांगुली स्टाईल सेलिब्रेशन, ब्रिटनवरील विजयानंतर चाहत्यांना आठवला २२ वर्षे जुना विजय

तत्पूर्वी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मोहम्मद सिराजने पहिल्याच चेंडूवर पथुम निसांकाला बाद करून भारताला भारताला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र, अविष्का फर्नांडो (४०) आणि कुसल मेंडिस (३०) श्रीलंकेचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. मात्र, मधल्या षटकांमध्ये विकेट घेण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. शेवटी दुनिथ वेल्लालगे (३९) आणि कामिंडू मेंडिस (४०) यांनी चांगली खेळी खेळून श्रीलंकेला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. ज्यामुळे श्रीलंकेने ५० षटकांत नऊ गडी गमावून २४० धावा केल्या. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरने १० षटकांत ३० धावांत सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, तर कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक विकेट्स मिळाली.

श्रीलंकेने तीन वर्षांनी भारताला पराभवाची धूळ चारली –

एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने भारतावर शेवटचा विजय जुलै २०२१ मध्ये मिळवला होता. त्यावेळी श्रीलंकेने टीम इंडियाचा ३ गडी राखून पराभव केला होता. यावेळी भारताला ३२ धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. याशिवाय मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, श्रीलंकेने १९९७ मध्ये वनडे मालिकेत टीम इंडियाचा शेवटचा पराभव केला होता. या मालिकेतील शेवटचा सामना जर श्रीलंकेने जिंकला तर २७ वर्षांनंतर भारताविरुद्ध वनडे मालिका जिंकेल.