कोलंबो कसोटीत श्रीलंकेच्या संघाने भारताविरूद्ध कडवी झुंज देत सामना ड्रॉ केला. कोलंबो कसोटीत टीम इंडियाने उत्कृष्ट सुरूवात केली होती. पण श्रीलंकेच्या सोनल दिनुशाने दोन्ही डावांमध्ये शतकं करत भारताच्या गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. श्रीलंकेने दुसऱ्या डावात १५४ षटकं फलंदाजी करत ९ बाद ४२९ धावा केल्या. श्रीलंकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय भारतीय संघाला चांगलाच महागात पडला.

श्रीलंकेच्या केवळ चार विकेट्स शिल्लक होत्या आणि त्यांची आघाडी अवघ्या १६ धावांची होती. मात्र, सोनल दिनुशा पुन्हा एकदा भारताच्या मार्गात अडसर ठरला; त्याने या मालिकेतील आपले तिसरं शतक झळकावलं आणि त्याच्या या शतकी खेळीने भारताच्या विजयाची संधी हिरावून घेतली. भारतीय संघ दुसरा कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर होता आणि श्रीलंकेने भारताला जेरीस आणत सामना ड्रॉ केला. श्रीलंकेसाठी हा ड्रॉ सामना जणू विजय होता.

भारताने सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतासाठी हा निर्णय अगदी योग्य ठरला. देवदत्त पडिक्कल व ध्रुव जुरेल यांनी शतकं झळकावली. यशस्वी जैस्वाल व केएल राहुलने संघाला चांगली सुरूवात करून दिली. यशस्वी जैस्वाल ४५ धावा करत बाद झाला. यानंतर आलेल्या देवदत्त पडिक्कलने १२ चौकारांसह ११७ दावांची खेळी केली. तर कर्णधार शुबमन गिलने ५० धावा तर ऋषभ पंतने ६३ धावांचं योगदान दिलं. ऋषभ पंत व ध्रुव जुरेलच्या जोडीने शतकी भागीदारी साकारली होती, ज्यामुळे भारताने ४०० धावांचा पल्ला गाठला होता. त्यानंतर रवींद्र जडेजाने ४३ धावा केल्या. यानंतर ध्रुव जुरेलने नाबाद ११५ धावांची खेळी करत संघाला ५०० धावांपर्यंत मोठी भूमिका बजावली. तर मोहम्मद सिराजने कमालीचा डिफेन्स करत ध्रुव जुरेलला चांगली साथ दिली.

भारतीय संघाने यासह पहिल्या डावात ९ बाद ५०३ धावा करत डाव घोषित केला. श्रीलंकेच्या संघाची पहिल्या डावात सुरूवात खूप खराब झाली आणि संघाने ३५ धावांवर ३ विकेट्स गमावल्या. पण पासिंदू सूरियाबंदारा व कामिंदू मेंडिस यांनी संघाचा डाव सावरला. पासिंदू ८० धावांवर बाद झाल्याने त्याचं शतक हुकलं. यानंतर खालच्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या सोनल दिनुशाने शतक करत १०३ धावा केल्या आणि संघ २९० धावा करत सर्वबाद झाला. यानंतर श्रीलंकेचा संघ २९० धावांवर सर्वबाद झाल्याने त्यांना फॉलोऑन टाळता आला नाही आणि भारताने श्रीलंकेला फॉलोऑन देत मोठी चूक केली.

भारताने श्रीलंकेला २१९ धावांची आघाडी असताना श्रीलंकेला फॉलोऑन दिला आणि प्रत्युत्तरात श्रीलंकेने १५४ षटकं फलंदाजी करत ९ बाद ४२९ धावांची धावसंख्या उभारली. दुसऱ्या डावात कामिल मिशाराने ३२ धावांची खेळी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. यानंतर पासिंदू सूरियाबंदारा ९२ धावांवर बाद झाल्याने त्याचं सलग दुसऱ्या डावातही शतक हुकलं. यानंतर कामिंदू मेंडिसने अर्धशतक तर धनंजय डिसिल्वाने २३ धावांचं योगदान दिलं. यानंतर सोनल दिनुशा व केशरा नुवांथाने ११२ धावांची भागीदारी साकारली. तर सोनल दिनुशाने १३३ धावांची नाबादी खेळी करत श्रीलंकेचा पराभव रोखला.