scorecardresearch

IND vs SL 2nd Test : भारताचा श्रीलंकेवर २३८ धावांनी दणदणीत विजय ; T20 नंतर कसोटीतही ‘क्लीन स्वीप’

घरच्या मैदानावर भारताचा हा सलग १५ वा मालिका विजय आहे

भारताने श्रीलंकेचा दुसऱ्या कसोटीत २३८ धावांनी दणदणीत पराभव केला आहे. याचबरोबर दोन सामन्यांची ही कसोटी मालिका २-० अशी जिंकली आहे. भारताने T20 नंतर कसोटी मालिकेतही क्लीन स्वीप दिला आहे.

श्रीलंकेला विजयासाठी ४४७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. पहिल्या डावात १०९ धावांवर बाद झालेल्या श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात केवळ २०८ धावाच करू शकला. घरच्या मैदानावर भारताचा हा सलग १५ वा मालिका विजय आहे. या अगोदर भारताने घरच्या मैदानावर डिसेंबर २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध मालिका गमावली होती. तेव्हा टीम इंडियाचं नेतृत्व एमएस धोनीकडे होतं.

भारताकडून रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या सामन्यात सर्वाधिक चार विकेट घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने डेल स्टेनला मागे टाकले आहे. जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात पाच विकेट आणि दुसऱ्या डावात तीन विकेट घेतल्या. अक्षर पटेलने दोन बळी घेतले आणि रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली.

दुसऱ्या दिवसअखेर पाहुण्या संघाने एक गडी गमावून २८ धावा केल्या होत्या. पहिल्याच षटकात लाहिरू थिरिमाने खाते न उघडता बाद झाला., जसप्रीत बुमराहने त्याची विकेट घेतली. तर कर्णधार दिमुथ करुणारत्ने १० आणि कुसल मेंडिस १६ धावांवर खेळत होते.

तर, भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या अर्ध्या तासांत श्रीलंकेचे चार गडी बाद करत संपूर्ण संघ पहिल्या डावात १०९ धावांत गुंडाळला होता. पहिल्या डावाच्या जोरावर भारताला १४३ धावांची आघाडी मिळाली होती. भारतीय संघाने दुसऱ्या डावात ९ बाद ३०३ धावा करून डाव घोषित केला. अशाप्रकारे भारताची एकूण आघाडी ४४६ धावांची झाली होती.

दुसऱ्या डावात श्रेयस अय्यरने सर्वाधिक ६७ धावा केल्या. अय्यरशिवाय ऋषभ पंतनेही ५० धावांची अर्धशतकी खेळी खेळली. लसिथ एम्बुल्डेनियाने श्रीलंकेसाठी दुसऱ्या डावातही तीन बळी घेतले. तर प्रवीण जयविक्रमाने सर्वाधिक चार बळी घेण्यात यश मिळवले. दोन्ही डावात अर्धशतकी खेळी करणाऱ्या श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला, तर ऋषभ पंतला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs sl 2nd test india beat sri lanka by 238 runs msr