India vs Sri Lanka, Asia Cup 2023: आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीतील भारतीय संघाचा दुसरा सामना कोलंबोमध्येच आर. प्रेमदासा स्टेडियमवर यजमान श्रीलंकेशी होत आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करायचे आहे. त्याचबरोबर श्रीलंकेचाही हा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न असेल. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने एक बदल केला असून शार्दुल ठाकूर ऐवजी एका फिरकीपटूचा संघात समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानवर २२८ धावांनी दणदणीत विजय नोंदवल्यानंतर, टीम इंडिया आता मंगळवारी (१२ सप्टेंबर) कोलंबो येथे आशिया चषक स्पर्धेतील दुसऱ्या सुपर-४ सामन्यात श्रीलंकेशी भिडणार आहे. याआधी, पावसामुळे प्रभावित झालेल्या आणि राखीव दिवसापर्यंत वाढवलेल्या पहिल्या सुपर-४ सामन्यात पाकिस्तानचा २२८ धावांनी पराभव करून भारताने पाकिस्तानविरुद्धचा सर्वात मोठा एकदिवसीय विजय नोंदवला होता. मात्र, सलग १३ वन डे विजयांचा विक्रम करणाऱ्या श्रीलंकेला पराभूत करणे टीम इंडियासाठी सोपे नसेल. आशिया चषक गटातील सामन्यात बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा पराभव केल्यानंतर श्रीलंकेने सुपर-४ सामन्यातही बांगलादेशचा पराभव केला आहे. रोहित, गिल, कोहली, राहुल यांचे आव्हान श्रीलंका कसे पेलणार? आशिया चषक सुपर-४ सामन्यात टीम इंडियाच्या टॉप-४ फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. रोहित शर्मा आणि शुबमन गिलने शानदार अर्धशतकं झळकावली, तर के.एल. राहुल आणि विराट कोहलीने शानदार शतकं झळकावली. या दोघांनीही पाकिस्तानी गोलंदाजांचा धुव्वा उडवत तिसऱ्या विकेटसाठी २३३ धावांची विक्रमी भागीदारी केली, जो आशिया चषकातील सर्वात मोठ्या भागीदारीचा नवा विक्रम आहे. त्याच्या मदतीने भारताने ५० षटकांत ३५६/२ धावा केल्या आणि त्यानंतर कुलदीप यादवच्या (२५/५) घातक गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानी संघाला ३२ षटकांत १२८ धावांवर रोखले आणि २२८ धावांनी मोठा विजय नोंदवला. हेही वाचा: IND vs PAK: टीम इंडियाने पाकिस्तानला दाखवले अस्मान! एक-दोन नाही तब्बल ‘एवढे’ विक्रम करत भारताने रचला इतिहास श्रेयस श्रीलंकेविरुद्धचा सामना खेळणार नाही भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून बाहेर आहे. बीसीसीआयने एक अपडेट जारी करून याबाबत माहिती दिली आहे. शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्त झाल्यानंतर तो नुकताच संघात परतला. मार्चमध्ये त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. मात्र, आता ही समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. आरोग्य अपडेट जारी करताना, बीसीसीआयने लिहिले, "श्रेयस अय्यरला सध्या बरे वाटत आहे, अद्याप तो पाठीच्या दुखण्यापासून पूर्णपणे बरा झालेला नाही. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून आज श्रीलंकेविरुद्ध भारताच्या सुपर-४ सामन्यासाठी तो संघासोबत स्टेडियममध्ये गेला नाही. आता प्रश्न उपस्थित होत आहे की जर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली तर १७ सप्टेंबरला होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यापर्यंत तो फिट असेल का? विश्वचषकापूर्वी टीम इंडियालाही धक्का बसू शकतो. नेपाळविरुद्धच्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना डायव्हिंग करताना श्रेयसला दुखापत झाली होती. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ एका बदलासह मैदानात उतरला आहे. शार्दुल ठाकूरच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. रोहितने सांगितले की, ही खेळपट्टी कालच्या तुलनेत कोरडी दिसत आहे. त्यामुळे भारतीय संघात तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजासोबत अक्षर पटेलही हा सामना खेळत आहे. श्रीलंकेच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दोन्ही संघांची प्लेईंग ११ भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. श्रीलंका: पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालागे, महिश तिक्षाना, कसुन राजिथा, मथिशा पाथिराना.