कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर काल रविवारी भारताने श्रीलंकेला सात गड्यांनी नमवत पहिला वनडे सामना जिंकला. या सामन्यातून भारतीय संघासाठी मुंबईचा सूर्यकुमार यादव व झारखंडचा युवा यष्टीरक्षक इशान किशन यांना वनडे पदार्पण करण्याची संधी मिळाली. आपल्या २३व्या वाढदिवशी पदार्पणाची संधी मिळालेल्या इशानने झंझावाती अर्धशतक झळकावून खास विक्रम रचला.

इशानने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत ४२ चेंडूत ८ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ५९ धावा ठोकल्या. तो आपल्या वाढदिवशी अर्धशतक साजरे करणारा पाचवा भारतीय फलंदाज बनला. यापूर्वी अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज विनोद कांबळी होता. त्याने २१व्या वाढदिवशी ही कामगिरी केली होती. त्यानंतर माजी सलामीवीर नवज्योत सिंग सिद्धू यांनी ३१व्या, सचिन तेंडुलकरने २५व्या, युसुफ पठाणने २६व्या वाढदिवशी अर्धशतक केले होते. वाढदिवशी पदार्पण करणारा व अर्धशतक ठोकणारा इशान पहिला फलंदाज बनला.

इशानचे अर्धशतक ३३ चेंडूत पूर्ण झाले. अशाप्रकारे पदार्पणात वेगवान अर्धशतक झळकावणारा तो दुसरा खेळाडू ठरला. पदार्पणात वेगवान अर्धशतकाचा विक्रम भारताच्या क्रुणाल पंड्याच्या नावावर आहे. त्याने यंदा इंग्लंडविरुद्ध २६ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. त्याच्यानंतर इशान आणि त्यानंतर रोनाल्ड बुचर (३५ चेंडू) आणि न्यूझीलंडचा जॉन मॉरिस (३५ चेंडू) यांचा समावेश आहे.

हेही वाचा – IND vs SL : नव्या दमाच्या टीम इंडियासमोर श्रीलंका बेचिराख!

पहिला वनडे सामना

टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने संघबांधणी करणाऱ्या भारतीय संघाचे सर्व प्रयोग रविवारी यशस्वी ठरले. कर्णधार शिखर धवन (९५ चेंडूंत नाबाद ८६ धावा), डावखुरा इशान किशन (४२ चेंडूंत ५९) आणि सलामीवीर पृथ्वी शॉ (२४ चेंडूंत ४३) या त्रिकुटाने केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारताने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेला तब्बल सात गडी आणि ८० चेंडू राखून सहज पराभूत केले. श्रीलंकेने दिलेले २६३ धावांचे लक्ष्य भारताने ३६.४ षटकांत गाठले.