India vs Sri Lanka 1st test Day 3 Highlights: भारत आणि श्रीलंका यांच्यातील गॉल कसोटीचा आज तिसरा दिवस आहे. भारताने या कसोटीत कमालीची सुरूवात करत धावांचा डोंगर उभारला आहे. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारताने ९ विकेट्स गमावत ४६० धावा केल्या आहेत. यानंतर भारतीय संघ ४६२ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर गोलंदाजीतही चांगली सुरूवात केली. पण त्यानंतर निरोशन डिकवेला व सोनल दिनुशा यांनी संघाचा डाव सावरला. पण अखेरीस संघ २८४ धावांवर सर्वबाद झाला आणि तरीही भारताकडे १७८ धावांची भक्कम आघाडी अद्याप आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
श्रीलंकेचा संघ सर्वबाद झाल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरणार होता. दिवसाचा खेळ संपण्यासाठी अजून अर्ध्या तासाचा वेळ शिल्लक होता. पण श्रीलंकेचा डाव संपताच अचानक ढग दाटून आले आणि पूर्ण काळोख झाला. पावसाला सुरूवात झाली नव्हती पण मैदान कव्हर्सने पूर्ण झाकण्यात आलं. सूर्यप्रकाश आणि पाऊसजन्य परिस्थिती पाहता पंचांना आजचा खेळ संपल्याचं जाहीर केलं.
श्रीलंकेचा संघ ऑलआऊट
ऋषभ पंतने ८०व्या षटकात लाहिरू कुमाराला मानव सुथारच्या गोलंदाजीवर स्टंपिंग करत झेलबाद केलं आणि श्रीलंकेचा संपूर्ण संघ ऑलआऊट झाला. श्रीलंकेचा संपूर्ण संघ ८० षटकांत २८४ धावांवर सर्वबाद केलं आहे. यासह आता भारतीय संघाकडे १७८ धावांची भक्कम आघाडी आहे.
जडेजाने मिळवून दिली ९वी विकेट
शतकी खेळी साकारल्यानंतर रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर पायचीत होत दिनुशा बाद झाला. यासह जडेजाने भारताला नववी विकेट मिळवून दिली.
श्रीलंकेला आठवा धक्का
सोनल दिनुशाने एक धाव घेत शतक केल्यानंतर पुढच्या चेंडूवर प्रभात जयसूर्या झेलबाद झाला. मानव सुथारच्या गोलंदाजीवर जडेजाने झेल टिपत त्याला माघारी धाडलं.
सोनल दिनुशाच शतक
सोनल दिनुशाने संघाचा डाव सावरत भारताविरूद्ध सामन्यात शतक झळकावलं आहे. दिनुशाने १६७ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह पहिलं कसोटी शतक झळकावलं.
केशरा नुवांथा झेलबाद
रवींद्र जडेजाने केशराला झेलबाद करवत त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ३५०वी कसोटी विकेट मिळवली. जडेजा हा ३५० कसोटी विकेट्स घेणारा भारताचा पाचवा गोलंदाज ठरला. तर ३५० विकेट्स घेणारा जगातील तिसरा डावखुरा गोलंदाज ठरला आहे. केशराने मारलेला फटका जैस्वालच्या पायाला लागत हवेत उंच उडाला आणि गिलने त्याला झेलबाद केलं.
प्रसिध कृष्णाने मोडली १४६ धावांची भागीदारी
निरोशन डिकवेला व सोनल दिनुशा यांच्या भागीदारीने भारतीय संघाच्या गोलंदाजांच्या नाकात दम केला होता. अखेरीस प्रसिध कृष्णाने ६२व्या षटकात निरोशन डिकवेला याला बाद करत संघाला मोठा ब्रेकथ्रू मिळवून दिला. निरोशन डिकवेला याने त्याच्या १४ वर्षांच्या कसोटी इतिहासात एकही शतक झळकावता आलेलं नाही. भारताविरूद्ध या कसोटीत अवघ्या २० धावांनी त्याचं शतक हुकलं. डिकवेलाने ११५ चेंडूत ७ चौकारांसह ८० धावा केल्या.
श्रीलंकेच्या नावे दुसरं सत्र
श्रीलंका क्रिकेट संघाने दुसऱ्या सत्रात एकही विकेट न गमावता संघाचा डाव सावरला. दुसऱ्या डावानंतर श्रीलंकेची धावसंख्या ५ बाद २१४ आहे. निरोशन डिकवेल्ला व सोनल दिनुशा यांनी सहाव्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी रचली आहे. सोनल दिनुशा ६२ तर निरोशन डिकवेल्ला ७१ धावांवर खेळत आहेत.
सोनल दिनुशाचं अर्धशतक
श्रीलंकेचा फलंदाज दिनुशाने भारताविरूद्ध कसोटीत अर्धशतक झळकावलं आहे. दिनुशाने ३ चौकारांसह ही खेळी साकारली.
निरोशन डिकवेल्लाचं अर्धशतक
श्रीलंकेचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज निरोशन डिकवेल्ला याने भारताविरूद्ध पहिल्या डावात अर्धशतक झळकावलं आहे. डिकवेल्लाने ६८ चेंडूत ५ चौकारांसह ही खेळी साकारली. याशिवाय दिनुशा अर्धशतकाच्या दिशेने जात आहे.
दिनुशा-डिकवेल्लाने सावरला श्रीलंकेचा डाव
श्रीलंकेने लंचब्रेकनंतर चांगली सुरूवात केली आहे. सोनल दिनुशा व निरोशन डिकवेल्ला यांनी संघाचा डाव सावरत सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी साकारली आहे.
लंचब्रेकपर्यंत श्रीलंकेने किती धावा केल्या?
पहिलं सत्र संपलं असून श्रीलंकेने ५ विकेट्स गमावत ९९ धावा केल्या आहेत. भारताच्या सर्व गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत श्रीलंका संघाला बॅकफूटवर टाकलं आहे.
श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत
जडेजाने धनंजय डी सिल्वाला झेलबाद करत भारताला पाचवी विकेट मिळवून दिली. के एल राहुलने कमालीचा लो कॅच पकडत या विकेटमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं. यासह चांगल्या लयीत दिसणारा डी सिल्वा २१ धावांवर झेलबाद झाला.
कुलदीपच्या खात्यात पहिली विकेट
१७व्या षटकात कुलदीप यादवने भारताला चौथी विकेट मिळवून दिली. कुलदीपच्या चेंडूवर खेळताना कामिंदू मेंडिसने खेळलेल्या चेंडूवर आपली नजर ठेवत गिलने डाईव्ह मारत एका हाताने चेंडू टिपला. गिलच्या कमाल कॅचने सर्वांचं लक्ष वेधलं.
मानव सुथारच्या खात्यात दुसरी विकेट
मानव सुथारने १४व्या षटकात संघाला अजून एक विकेट मिळवून दिली. मानव सुथारने लाहिरू उदाराला झेलबाद केलं. तर यशस्वी जैस्वालने शानदार झेल टिपला. यासह १४ षटकांत श्रीलंकेने ३ बाद ५३ धावा केल्या आहेत.
मानव सुथारच्या जाळ्यात अडकला दिनेश चंडीमल
आठव्या षटकात मानव सुथारला कॅप्टनने मानव सुथारला गोलंदाजीसाठी आणलं आणि त्याने पहिल्याच चेंडूवर संघाला दुसरी विकेट मिळवून दिली. त्याला पहिल्याच चेंडूवर कमालीचा टर्न मिळाला आणि ऋषभ पंतने शानदार झेल टिपला.
सिराजने पहिल्याच षटकात मिळवून दिली विकेट
मोहम्मद सिराजने भारताकडून गोलंदाजीला सुरूवात केली. यासह त्याने पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर भारताला पहिली विकेट मिळवून दिली. स्पिलमध्ये असलेल्या देवदत्त पडिक्कलने कमालीचा झेल टिपला. यासह निशान फर्नांडो झेलबाद झाला.
IND vs SL 1st Test: टीम इंडिया ऑल आऊट
भारतीय संघ तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच सर्वबाद झाला आहे. प्रसिध कृष्णा असिथो फर्नांडोच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आणि संपूर्ण संघ सर्वबाद झाला. भारताने पहिल्या डावात ४६२ धावांचा डोंगर उभारला आहे.
IND vs SL 1st Test Day 3 Live: सामन्याला सुरूवात
दुसऱ्या दिवशी पावसामुळे सामना उशिरा सुरू झाल्याने वेळ भरून काढण्यासाठी आज सामना १५ मिनिटे लवकर सुरू करण्यात आला आहे. कुलदीप यादव व प्रसिध कृष्णाची जोडी मैदानावर आहे.
IND vs SL 1st Test Day 2 Highlights: गॉल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी काय घडलं?
भारताने गॉल कसोटीत पहिल्या दिवशी २७७ धावा केल्यानंतर पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ उशीराने सुरू झाला. यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. ऋषभ पंत ३९ धावांवर बाद झाल्यानंतर रिटायर्ड हर्ट झालेला के एल राहुल पुन्हा फलंदाजीला आला, पण तो ८२ धावांवर बाद झाल्याने त्याचं शतक हुकलं. यानंतर देवदत्त पडिक्कलने कमालीची १६७ धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. यानंतर ध्रुव जुरेलने अर्धशतकी खेळी केली, तर जडेजा १३ धावा, मानव सुथार २४ धावा तर सिराजने ११ धावांचं योगदान दिलं. आता मैदानावर कुलदीप यादव १२ धावा करत प्रसिध कृष्णा १ धाव करत खेळत आहेत. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्याने सर्वाधिक ४ विकेट्स तर केशरा नुवंथाने ३ व असिथा फर्नांडोने १ विकेट घेतली आहे.
