Shubman Gill Record: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली होती. पण दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना चांगलाच घाम फोडला. भारतीय संघाने ५०० धावांचा डोंगर उभारला, फॉलोऑन दिला. तरीदेखील हा सामना बरोबरीत सुटला. ज्या सामन्यात सोपा विजय मिळवण्याची सुवर्णसंधी होती, त्या सामन्यात भारतीय संघाला ड्रॉ वर समाधान मानावं लागलं. भरतीय संघाने ही मालिका १-० ने आपल्या नावावर केली. यादरम्यान कर्णधार शुबमन गिलच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
असा रेकॉर्ड करणारा तिसराच भारतीय कर्णधार
भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ १९८५ मध्ये पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. त्यानंतर अनेक कसोटी सामने, दौरे आणि मालिका झाल्या आहेत. पण केवळ २ असे भारतीय कर्णधार होते, ज्यांनी श्रीलंकेत जाऊन श्रीलंकेला पराभूत केलं होतं. या रेकॉर्डमध्ये मोहम्मद अझरुद्दीन आणि विराट कोहलीच्या नावाचा समावेश होता. पण या रेकॉर्डच्या यादीत आता भारताचा युवा कर्णधार शुबमन गिलचं देखील नाव जोडलं गेलं आहे. शुबमन गिल हा श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकणारा तिसराच भारतीय कर्णधार ठरला आहे.
याआधी भारतीय संघाने १९९३ मध्ये मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली खेळताना श्रीलंकेत १-० ने विजय मिळवला होता. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने श्रीलंकेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना २ कसोटी मालिका जिंकल्या होत्या. २०१५ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघान २-१ ने विजय मिळवला होता. तर २०१७ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाे ३-० ने विजय मिळवला होता. यासह श्रीलंकेत सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा रेकॉर्ड देखील विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने सर्वाधिक ५ कसोटी सामने जिंकले आहेत.
भारतीय संघाचा मालिका विजय
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची होती. मालिकेतील पहिला सामना गॉलच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली होती. दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाला विजय मिळवण्याची संधी होती. पण सोनल दिनुशाच्या शतकी खेळीमुळे सामना बरोबरीत सुटला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ९ गडी बाद ५०३ धावा करुन डाव घोषित केला. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेचा डाव २९० धावांवर आटोपला. भारतीय संघाने श्रीलंकेला फॉलोऑन दिला. पण त्यानंतर भारतीय संघाला पुन्हा फलंदाजीला येण्याची संधीच मिळाली नाही. श्रीलंकेने २०० हून अधिक धावांची आघाडी घेतली. त्यामुळे सामना बरोबरीत राहिला.
