scorecardresearch

IND vs SL : सुरंगा लकमलला बाद करताच जसप्रीत बुमराने मिठी मारली; पाहा VIDEO

बाद होताच बुमरा लकमलकडे धावला, त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी हस्तांदोलन केले.

Suranga Lakmal was dismissed Jasprit Bumrah ran to him
(फोटो सौजन्य – @BCCI)

भारताने सोमवारी दुबळ्या श्रीलंकेविरुद्धच्या प्रकाशझोतातील दुसऱ्या कसोटी सामन्यात २३८ धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली आणि दोन सामन्यांच्या मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळवले. हा कसोटी सामना श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना होता. लकमलच्या रूपाने श्रीलंकेने नववी विकेट गमावली. जसप्रीत बुमराहने लकमलला बाद केले होते. पण बाद होताच बुमरा त्याच्याकडे धावला, त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी हस्तांदोलन केले.

श्रीलंकेचा गोलंदाज सुरंगा लकमलचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यामुळे सामना संपल्यानंतर जसप्रीत बुमराहसह अनेक खेळाडूंनी त्याच्याशी हस्तांदोलन करून अभिनंदन केले. या सामन्यात लकमलला बुमराने बाद केले होते. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विट केला आहे. यामध्ये ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’ सुरंगा लकमल आज शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला, त्याचे अभिनंदन, असे कॅप्शन लिहिले आहे.

बुमराहच नाही तर कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली या सर्वांनी लकमलकडे जाऊन त्याचे अभिनंदन केले. लकमलने श्रीलंकेसाठी ७० कसोटी सामने खेळले आहेत. ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका असेल, असे त्याने आधीच जाहीर केले होते. ३५ वर्षीय लकमलने श्रीलंकेसाठी ७० कसोटी सामन्यांमध्ये १७१ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने श्रीलंकेसाठी ८६ एकदिवसीय आणि ११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत.

दरम्यान, बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या डे नाईट कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेचा २३८ धावांनी पराभव केला. यासह भारताने आता दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० असा क्लीन स्वीप केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने २५२ धावा केल्या आणि त्यानंतर श्रीलंकेला पहिल्या डावात १०९ धावांत गुंडाळत १४३ धावांची आघाडी घेतली. यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात ९ बाद ३०३ धावा करून डाव घोषित केला आणि श्रीलंकेसमोर ४४७ धावांचे लक्ष्य ठेवले.

प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ तिसऱ्या दिवशीच २०८ धावांवर गारद झाला. भारताकडून दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनने चार आणि जसप्रीत बुमराहने तीन बळी घेतले. त्याच्याशिवाय अक्षर पटेलने दोन आणि रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली. कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने श्रीलंकेसाठी सर्वाधिक १०७ धावांचे शतक झळकावले. त्याच्याशिवाय कुसल मेंडिसने ५४ आणि निरोशन डिकवेलाने १२ धावा केल्या. उर्वरित फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs sl suranga lakmal was dismissed jasprit bumrah ran to him and hugged him abn

ताज्या बातम्या