भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका ४ मार्चपासून सुरू होत आहे. मोहालीत पहिला कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आपले १०० कसोटी सामने पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा तो १२वा भारतीय खेळाडू असेल. या सामन्यात विराट त्याच्या ८००० कसोटी धावाही पूर्ण करू शकतो. असा विक्रम करणारा कोहली हा सहावा भारतीय फलंदाज ठरणार आहे. कसोटीत ८००० धावा पूर्ण करण्यापासून तो फक्त ३८ धावा दूर आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावसकर, वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी हा पराक्रम केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहाली कसोटीच्या पहिल्या डावात विराटने ३८ धावा केल्या तर कसोटीत सर्वात जलद ८००० धावा करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरेल. तो १६९ डावांत हा धावांचा आकडा गाठेल. सचिनने अवघ्या १५४ डावात ८००० धावा पूर्ण केल्या होत्या. सचिन हा कसोटीत सर्वात वेगवान आठ धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्यापाठोपाठ राहुल द्रविडने १५८ डावात, वीरेंद्र सेहवागने १६० आणि सुनील गावसकर यांनी १६६ डावात ही कामगिरी केली होती. विराट गेल्या दोन वर्षांपासून धावांसाठी झगडत आहे. त्याचे शेवटचे शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध झाले होते. विराटच्या कारकिर्दीतील ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा त्याला सलग दोन वर्षे शतक झळकावता आलेले नाही.

हेही वाचा – IPL 2022 नंतर रोहित ब्रिगेडसमोर असणार ‘ही’ मोहीम!

विराटने २०२१ मध्ये भारतात पाच कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने अवघ्या २६ च्या सरासरीने २०८ धावा केल्या. तो आठ डावांत तीनवेळा शून्यावर बाद झाला. आठ पैकी सहा फिरकी गोलंदाजांनी त्याची विकेट घेतली. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून विश्रांती घेतल्यानंतर विराटकडून कामगिरीची अपेक्षा आहे.

श्रीलंकेविरुद्ध मोठा विक्रम

विराट कोहलीचा श्रीलंकेविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. या संघाने शेवटचा भारत दौरा केला तेव्हा विराटने तीन सामन्यांत ६१० धावा केल्या होत्या. या मालिकेत त्याने नागपुरात २१३ आणि दिल्लीत २४३ धावा केल्या. श्रीलंकेविरुद्धही त्याने सलग तीन शतके झळकावली आहेत. आपल्या जुन्या रेकॉर्डवरून प्रेरणा घेत विराट या मालिकेत शतकांचा दुष्काळ संपवू शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl virat kohli is 38 runs away from completing 8000 test runs adn
First published on: 02-03-2022 at 13:24 IST