INDIA vs USA Live Cricket Score Updates, T20 WC 2026 Match 3: भारतीय वंशाच्या खेळाडूंचा भरणा असलेल्या अमेरिकेच्या संघाने बलाढ्य भारतीय संघाला चांगलंच तंगवलं. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची ७७/६ अशी अवस्था झाली होती. सूर्यकुमार यादवच्या ४९ चेंडूत ८४ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने १६१ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना अमेरिकेचे तीन शिलेदार झटपट तंबूत परतले. संजय कृष्णमूर्ती आणि शुभम रांजणे यांनी प्रत्येकी ३७ तर मिलिंद कुमारने ३४ धावा केल्या मात्र भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत अमेरिकाला वरचढ होऊ दिलं नाही. त्यांनी १३२ धावा केल्या. मोहम्मद सिराजने ३ तर अर्शदीप सिंग, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
INDIA vs USA Highlights, ICC T20 World Cup 2026: भारत विरुद्ध अमेरिका टी२० वर्ल्डकप सामन्याचे हायलाईट्स
टीम इंडियाचा संघर्षपूर्ण विजय
सूर्यकुमार यादवच्या झुंजार अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाने अमेरिकेवर २९ धावांनी विजय मिळवला. अमेरिकेने शिस्तबद्ध गोलंदाजी करत भारताला १६१ धावांतच रोखलं. भारतीय संघाने अमेरिकेला १३२ धावाच करू दिल्या.
टीम इंडिया विजयाच्या दिशेने
धावांना वेसण घालत आणि नियमितपणे विकेट्स पटकावत भारतीय संघाने अमेरिकेला चमत्कारापासून रोखलं आहे.
अक्षरने दूर केला संजयचा अडथळा
अक्षर पटेलने संजय कृष्णमूर्तीला बाद करत अमेरिकेच्या डावाला खिंडार पाडलं. संजयने ३७ धावांची चांगली खेळी केली.
अमेरिकेने गमावला चौथा भिडू
वरुण चक्रवर्तीने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या अमेरिकेच्या मिलिंद कुमारला बाद करत जोडी फोडली. मिलिंदने ३४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
अमेरिकेची पडझड
अनुभवाची कमी असलेल्या अमेरिकेच्या फलंदाजांची भारतासमोर घसरगुंडी उडाली आहे. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये त्यांनी ३ विकेट्स गमावल्या आहेत.
सिराजने मिळवून दिलं पहिलं यश
हर्षित राणाऐवजी संघात आलेल्या मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात भारताला यश मिळवून दिलं. त्याने अँड्रियस गौसला बाद केलं.
कर्णधार सूर्यकुमार यादवने सौरभ नेत्रावळकरच्या अखेरच्या षटकात चौकार-षटकारांच्या मदतीने २१ धावा कुटत टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. सूर्याने या सामन्यात ४९ चेंडूत १० चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८४ धावांची खेळी केली. यासह टीम इंडियाने खराब सुरूवातीनंतर ९ बाद १६१ धावा केल्या. यासह अमेरिकेला विजयासाठी १६२ धावांचं आव्हान दिलं.
सूर्यकुमार यादवने पूर्ण केलं अर्धशतक
संघ अडचणीत असताना सूर्यकुमार यादवने कर्णधाराला साजेसा खेळ करत अर्धशतकी खेळी केली. शुभम रांजणेच्या गोलंदाजीवर चौकार खेचत सूर्यकुमारने अर्धशतक पूर्ण केलं.
हरमीत सिंगने केलं अक्षरला बाद
धावसंख्या वाढवण्यासाठी आक्रमक फटका लगावणाऱ्या अक्षर पटेलचा फटका मोहसीनच्या हातात जाऊन विसावला. मुंबईकर हरमीतने अक्षरसारख्या महत्त्वाच्या शिलेदाराला तंबूत पाठवले.
सूर्यादादाची जोरदार फटकेबाजी
संघ अडचणीत सापडलेला असताना कर्णधार सूर्यकुमार यादवने सूत्रधाराची भूमिका स्वीकारत जोरदार फटकेबाजी केली. सौरभ नेत्रावळकरच्या षटकात सूर्याने एक षटकार आणि एक चौकार लगावला. अक्षर पटेलने दोन चौकार लगावत त्याला चांगली साथ दिली.
हार्दिक पंड्याही तंबूत
अमेरिकेच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली आहे. हार्दिक पंड्या हरमीत सिंगच्या गोलंदाजीवर बाद होऊन परतला आहे. टीम इंडियाने सहा शिलेदार गमावले आहेत.
रिंकू सिंह तंबूत
सुरुवातीच्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे लवकर फलंदाजीला फिनिशर रिंकू सिंह मोठी खेळी करू शकला नाही. मोहम्मद मोहसीनने त्याला बाद केलं.
शिवम दुबेही बाद; अमेरिका जोरात
भारताच्या ताकदवान फलंदाजीला अमेरिकेने खिंडार पाडलं आहे. शॅडले स्लायलॅकच्या गोलंदाजीवर शिवम दुबे पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे.
तिलक वर्माही तंबूत
शॅडले स्कायलॅकच्या उसळत्या चेंडूवर पूलचा फटका मारायचा तिलक वर्माचा प्रयत्न फिल्डरच्या हातात जाऊन विसावला.
फटकेबाजीनंतर इशान किशन माघारी
चांगल्या फटकेबाजीनंतर डावखुरा सलामीवीर इशान किशन तंबूत परतला आहे. त्याने १६ चेंडूत २० धावा केल्या.
तिलक वर्मा लयीत
अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर दाखल झालेल्या तिलक वर्माने सूत्रं हाती घेत फटकेबाजी सुरू केली आहे.
टीम इंडियाला धक्का; अभिषेक शर्मा तंबूत
अमेरिकेच्या चतुर डावपेचांसमोर झंझावाती फॉर्मात असलेला अभिषेक शर्मा फसला. थर्डमॅनऐवजी डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात करत अमेरिकेने युक्ती साधली. अभिषेक पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता बाद झाला.
इशांतची षटकाराने सुरुवात
इशान किशनने सौरभ नेत्रावळकरच्या पहिल्या षटकात खणखणीत षटकारासह सुरुवात केली.
अमेरिकेच्या संघात शुभम, हरमीत, सौरभ हे तीन मुंबईकर
मोनांक पटेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या अमेरिकेच्या संघात भारतीय वंशाच्या असंख्य खेळाडूंचा समावेश आहे. वानखेडे स्टेडियममध्ये खेळणं त्यांच्यासाठी स्वप्नवत आहे असं मोनांकने सांगितलं.
अमेरिकेचा संघ- अँड्रियास गौस, साईतेजा मुक्कमला, मिलिंद कुमार, मोनांक पटेल, संजय कृष्णमूर्ती, शुभम रांजणे, हरमीत सिंग, मोहम्मद मोहसीन, शॅडले व्हॅन सायवॉक, अली खान आणि सौरभ नेत्रावळकर
बुमराह आजारी, सिराजला संधी
टी२० प्रकारात जगातला सगळ्यात भेदक गोलंदाज असं वर्णन होणारा जसप्रीत बुमराह अमेरिकेविरुद्धच्या लढतीत खेळू शकणार नाही. कर्णधार सूर्यकुमार यादवने यासंदर्भात माहिती दिली.
भारतीय संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रिंकू सिंह, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
अमेरिकने टॉस जिंकला; बॉलिंगचा निर्णय
अमेरिकेने भारताविरुद्धच्या लढतीत टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.
जसप्रीत बुमराह खेळणार?
टीम इंडियाचं प्रमुख अस्त्र असलेला जसप्रीत बुमराह या लढतीत खेळण्याची शक्यता कमी आहे. बुमराहला बरं नसल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. दुखापतींच्या शक्यतेमुळे बुमराह वर्कलोड मॅनेजमेंट नुसारच खेळतो. तो एखाद्या मालिकेतले सगळे सामने खेळत नाही. हर्षित राणा वर्ल्डकपबाहेर गेल्याने मोहम्मद सिराजला संधी मिळाली आहे. बुमराह खेळू न शकल्यास सिराजचा अंतिम संघात समावेश होऊ शकतो. बुमराहने दोन वर्षांपूर्वी झालेल्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता.
हर्षित राणा स्पर्धेबाहेर, मोहम्मद सिराजला संधी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतग्रस्त झाला. हर्षितच्या गुडघ्याला दुखापत झाली. दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्यामुळे हर्षित वर्ल्डकप खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. हर्षितऐवजी मोहम्मद सिराजचा संघात समावेश करण्यात आला. आयसीसीच्या तांत्रिक समितीने या बदलाला मान्यता दिली आहे. हर्षितने न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच आटोपलेल्या मालिकेत चांगली गोलंदाजी करताना एक अर्धशतकही झळकावलं होतं.

<br />IND vs USA HighlightsT20 WC 2026

