India vs West Indies : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान शुक्रवारपासून (२२ जुलै) तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याऐवजी शिखर धवनकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीतीमध्ये शिखर धवनसोबत सलामीला कोण येणार हा प्रश्न आहे. वेस्ट इंडीजमध्ये दाखल झालेल्या संघात ईशान किशन, ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल हे तीन पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, या तिघांपैकी ऋतुराज प्रबळ दावेदार मानला जात आहे.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड भारतीय डावाची सुरुवात करू शकतात. कारण, विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराजने जबरदस्त कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेत त्याने १५० च्या सरासरीने धावा केल्या होत्या. त्याने पाच सामन्यात चार शतकांच्या मदतीने ६९३ धावा फटकावल्या होत्या. यादरम्यान त्याने ५१ चौकार आणि १९ षटकार मारले होते.

हेही वाचा – चेतेश्वर पुजाराची ऐतिहासिक कामगिरी; लॉर्ड्सवर द्विशतक ठोकणारा पहिला भारतीय

ऋतुराजची कामगिरी पाहता वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात त्याला सलामीला येण्याची संधी मिळू शकते. ऋतुराजला सलामीवीर म्हणून संधी मिळायला हवी, असे माजी सलामीवीर वसीम जाफरचेही मत आहे. तो म्हणाला, “मला वाटते ऋतुराजने एकदिवसीय संघात पदार्पण करावे. त्याने शिखरसोबत सलामीला आले पाहिजे. त्याला संधी दिली तर डाव्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजीचे गणितही योग्य बसेल.”

ऋतुराज गायकवाडशिवाय ईशान किशनही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत त्याने टी २० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन रोहित शर्माची जागा कोणाला देणार, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.