India vs West Indies 2nd T20I: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा टी-२० सामना रांचीत पार पडला. या सामन्यातील दोन्ही डावात मिळून ५०० हून अधिक धावा बनवल्या गेल्या. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २४९ धावा केल्या आणि वेस्ट इंडिजला विजयासाठी २५० धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान वेस्ट इंडिजने अवघ्या १८.३ षटकांत पूर्ण करून दमदार विजयाची नोंद केली आणि मालिका १-१ ने बरोबरीत आणली. यासह भारताविरुद्ध खेळताना एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
वेस्ट इंडिजने मोडला ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड
याआधी भारतीय संघाविरुद्ध खेळताना सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करण्याचा रेकॉर्ड हा ऑस्ट्रेलियाच्या नावे होता. ऑस्ट्रेलियाने २०२३ मध्ये भारतीय संघाविरुद्ध खेळताना २२३ धावांचा यशस्वी पाठलाग करून सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला होता. आता शे होपच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वेस्ट इंडिजने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. वेस्ट इंडिजने भारतीय संघाविरुद्ध खेळताना २५० धावांचा डोंगर सर केला आहे. यासह भारताविरुद्ध खेळताना २५० धावा करणारा वेस्ट इंडिज हा जगातील पहिलाच संघ ठरला आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वात मोठे आव्हान पूर्ण करणारे संघ:
वेस्ट इंडिज- २५० धावा (रांची, २०२६)
ऑस्ट्रेलिया- २२३ धावा (गुवाहाटी, २०२३)
दक्षिण आफ्रिका- २१२ धावा (दिल्ली, २०२२)
ऑस्ट्रेलिया- २०९ धावा (मोहाली, २०१२)
दक्षिण आफ्रिका- २०० धावा ( धरमशाला, २०१५)
वेस्ट इंडिजचा विक्रमी विजय
भारतीय संघाने दिलेल्या २५० धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला चांगल्या सुरूवातीची गरज होती. पण अशी सुरूवात मिळू शकली नाही. कामिल पूरन आणि शिमरॉन हेटमायर या दोघांनाही मयंक यादवने पहिल्याच षटकात तंबूत धाडलं. त्यानंतर शे होप आणि पॉवेलने फटकेबाजी करत संघाची धावसंख्या ५० धावांच्या पार पोहोचवली. शेवटी शे होप आणि रुदरफोर्डने शतकी भागीदारी केली आणि सामना भारताकडून हिसकावून घेतला. रूदरफोर्ड शतकाच्या जवळ असताना बाद झाला. तर होपने शतक पूर्ण केलं आणि वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला.
