IND vs WI : हैदराबाद येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली असून पहिल्या दिवसाचा खेळ सुरु आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून विंडिजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण या सामन्यातही भारताच्या गोलंदाजांनी त्यांना फारसे डोके वर काढू दिले नाही. या सामन्यात दोनही संघांत बदल करण्यात आले. भारतीय संघात शार्दूल ठाकूरचे कसोटी पदार्पण झाले. तो २९४ वा भारतीय कसोटीपटू ठरला. त्याच्या पदार्पणाबरोबरच एक अनोखा योगायोग टीम इंडियात पाहायला मिळाला.

२०१८ मध्ये कसोटी पदार्पण करणारा शार्दूल पाचवा खेळाडू ठरला. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते त्याला कसोटी कॅप प्रदान करण्यात आली. या वर्षी कसोटीत जसप्रीत बुमराह याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, ऋषभ पंत आणि हनुमा विहारी यांनी इंग्लंडविरुद्ध तर पृथ्वी शॉ आणि शार्दूल ठाकूर यांनी विंडीजविरुद्ध पदार्पण केले. यातील हनुमा विहारी याने इंग्लंडविरुद्ध शेवटच्या सामन्यात पदार्पण केले. तर पृथ्वी शॉ याने विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीत आणि शार्दूल ठाकूरने दुसऱ्या कसोटीतून पदार्पण केले. भारताने सलग तीन कसोटीत नव्या चेहऱ्याला संधी दिली.

सलग तीन कसोटीत तीन खेळाडू पदार्पण करण्याची ही २०१३ नंतरची पहिलीच वेळ आहे. या आधी २०१३ मध्ये शिखर धवन व अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाविरूद्ध तर मोहम्मद शमीने विंडिजविरूद्ध सलग तीन सामन्यांत पदार्पण केले होते.