वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने धडाकेबाज खेळ करत बाजी मारली. विंडीजने विजयासाठी दिलेलं ३१६ धावांचं आव्हान भारतीय संघाने ४ गडी राखत पूर्ण केलं. कर्णधार विराट कोहली, सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांची अर्धशतकं ही भारतीय संघाच्या विजयाची वैशिष्ट्य ठरली. मात्र मुंबईकर शार्दुल ठाकूर अंतिम सामन्यात संघासाठी तारणहार ठरला. मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत शार्दुलने भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.

शार्दुलच्या या खेळीवर कर्णधार विराट कोहली भलताच खुश झाला आहे. विराटने आपल्या ट्विटरवर शार्दुलसोबत एक फोटो टाकत, तुला मानलं रे ठाकूर ! अशी मराठीतून कॅप्शन देत त्याचं कौतुक केलं.

चांगल्या सुरुवातीनंतर अखेरच्या सामन्यात भारताची मधली फळी पुरती कोलमडली. श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि केदार जाधव झटपट माघारी परतले. मात्र कर्णधार विराटने रविंद्र जाडेजाच्या साथीने एक बाजू लावून धरत भारताला विजयाच्या जवळ नेलं. मात्र विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना कोहली ८५ धावांवर बाद झाला. यामुळे भारत सामना गमावतो की काय असं चित्र निर्माण झालं होतं.

मात्र शार्दुल ठाकूरने मैदानात उतरताच आपल्या खडूस फटकेबाजीचं प्रदर्शन करत सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलवलं. शार्दुल ठाकूरने ६ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने १७ धावा केल्या.

अवश्य वाचा – Video : मुंबईकर शार्दुल ठाकूर ठरला टीम इंडियाचा तारणहार, फटकेबाजीने सामना फिरवला