India vs West Indies 3rd T20I: भारतीय संघ टी-२० मालिकेत दमदार पुनरागमन केलं आहे. या संपूर्ण मालिकेत धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवले आहेत. पण भारतीय संघाने पहिल्यांदाच धावांचा बचाव करताना विजय मिळवला आहे. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २२३ धावांचा डोंगर उभारला. वेस्ट इंडिजला विजयासाठी २२४ धावा करायच्या होत्या. पण भारतीय गोलंदाजांनी कसून गोलंदाजी केली आणि वेस्ट इंडिजला २०९ धावांवर रोखलं. यासह भारतीय संघाने हा सामना १४ धावांनी जिंकून मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.
वेस्ट इंडिजला २२४ धावांचा पाठलाग करण्यासाठी वेगवान सुरूवातीची गरज होती. पण या सामन्यात तसं काही झालं नाही. कारण अर्शदीप सिंगने कर्णधार शे होपला स्वस्तात बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर कामिल पूरन आणि हेटमायरने मिळून संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी मिळून संघाची धावसंख्या ५० धावांच्या पार पोहोचवली. पूरनने ४२ धावांचे योगदान दिले. तर हेटमायरने ४३ धावांचे योगदान दिले. रोमन पॉवेल अवघ्या ५ धावा करून माघारी परतला. त्यानंतर रुदरफोर्ड आणि किमो पॉलने शेवटी डाव सांभाळला होता. पण अर्शदीप सिंगने दोन्ही फलंदाजांना एकाच षटकात बाद केलं आणि भारतीय संघाला सामना जिंकून दिला.
भारतीय संघाने केल्या २२३ धावा
या सामन्यातही भारतीय संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. डावाच्या सुरूवातीलाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. संजू सॅमसन ३ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि इशान किशनने शतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरला. अभिषेक शर्माने ६९ धावांची खेळी केली. तर इशान किशनने ३७ धावांचे योगदान दिले. कर्णधार श्रेयस अय्यर १ धाव करून माघारी परतला. त्यानंतर तिलक वर्मा २८, नमन धीर १०, नितीश कुमार रेड्डी २१ आणि अक्षर पटेलने २० धावा केल्या. शेवटच्या षटकात प्रिन्स यादवने ३ चौकार खेचून भारतीय संघाची धावसंख्या २२३ धावांवर पोहोचवली.
अर्शदीप सिंगची दमदार गोलंदाजी
या सामन्यात धावांचा बचाव करताना अर्शदीप सिंगने ३ गडी बाद केले. यादरम्यान सुरूवातीलाच शे होपला बाद करून वेस्ट इंडिजला सुरूवातीलाच मोठा धक्का दिला. त्यानंतर जेव्हा किमो पॉल आणि रुदरफोर्डची जोडी जमली होती. त्यावेळी त्याने एकाच षटकांत दोघांना बाद केलं आणि भारतीय संघाला सामन्यात दमदार पुनरागमन करून दिलं.
