India vs West Indies 4th T20I, Shai Hope Century Record: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्याचा थरार रंगला. या सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. या डावातही वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होपच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. होपने या डावात नाबाद १०२ धावांची खेळी केली. यासह ख्रिस गेलचा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

या संपूर्ण दौऱ्यावर शे होपने तुफान फटकेबाजी केली आहे. या सामन्यातही वेस्ट इंडिजला पहिल्या डावात फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि शे होपने या आमंत्रणाचा दोन्ही हातांनी स्वीकार केला. त्याने टॉप ४ फलंदांजासोबत मिळून प्रत्येकी ५०-५० धावांची भागीदारी केली. यादरम्यान त्याने २८ चेंडूंमध्ये षटकार खेचून आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर ४ चौकार आणि ९ षटकार खेचून ५० चेंडूंमध्ये १०२ धावांची वादळी शतकी खेळी केली. हे त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे शतक आहे. यासह तो वेस्ट इंडिजसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. यादरम्यान त्याने ख्रिस गेलचा सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. गेलच्या नावे २ शतकं झळकावण्याची नोंद आहे.

वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक शतकं झळकावणारे फलंदाज

शे होप- ३ शतकं*
ख्रिस गेल- २ शतकं

वेस्ट इंडिजने उभारला २४७ धावांचा डोंगर

या सामन्यात डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या शे होप आणि अँड्रयूने जोरदार सुरूवात करून दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ५२ धावा जोडल्या. अँड्रयू २१ धावा करून माघारी परतला. त्यानंतर शिमरॉन हेटमायरने ३३ धावांची खेळी केली. तर रोमन पॉवेलने २४ आणि शेवटी रुदरफोर्डने नाबाद ४९ धावांची खेळी केली. तर शे होप १०२ धावांवर नाबाद राहिला.

शे होपची भारत दौऱ्यावरील कामगिरी

या दौऱ्यावर शे होपचा सुपरहिट शो पाहायला मिळाला आहे. वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने १०४, तिसऱ्या वनडेत १६२ धावांची खेळी केली होती. त्यानंतर पहिल्या टी-२० सामन्यात ५२, दुसऱ्या टी-२० सामन्यात नाबाद १०२ आणि आता चौथ्या टी-२० सामन्यात नाबाद १०२ धावांची खेळी केली.