India vs West Indies 4th T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना शे होपने वादळी शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने २४७ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने दमदार सुरुवात करून दिली. पण भारतीय संघ हवा तसा शेवट करू शकला नाही. भारतीय संघाने हा सामना २४ धावांनी गमावला आहे. यासह वेस्ट इंडिजने मालिकेत २-२ ने बरोबरी केली आहे.
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २४८ धावांचा डोंगर सर करायचा होता. त्यामुळे भारतीय संघाला चांगल्या सुरुवातीची गरज होती. डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या संजू सॅमसनने एकहाती दमदार सुरूवात करून दिली. संजूने ५६ धावांची वादळी खेळी केली. तर अभिषेक शर्मा २९ धावांवर माघारी परतला. इशान किशन ६ धावांवर माघारी परतला. त्यानंतर श्रेयस अय्यरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तो अवघ्या १६ धावांवर माघारी परतला. तिलक वर्मा आणि नितीश रेड्डीने शेवटी भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. पण तिलक ४३ धावांवर बाद झाल्यानंतर नितीश कुमार रेड्डीही ४१ धावांवर माघारी परतला.
वेस्ट इंडिजने उभारला २४७ धावांचा डोंगर
या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या शे होप आणि अँड्र्यूने दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५२ धावा जोडल्या. अँड्र्यू २१ धावा करून माघारी परतला. तर हेटमायरने ताबडतोड ३३, रोमन पॉवेलने २४ धावांची खेळी केली. तर रुदरफोर्ड शेवटी ४९ धावांवर नाबाद राहिला. तर शे होपने नाबाद १०२ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या २४७ धावांवर पोहोचवली.
शे होपचं विक्रमी शतक
या सामन्यातही शे होपच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. डावाची सुरूवात करताना शे होपने २८ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि ५० चेंडूंमध्ये १०२ धावांची वादळी शतकी खेळी केली. हे त्याचं लागोपाठ दुसरं शतक आहे. यासह टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ शतकं झळकावण्यासह त्याने वेस्ट इंडिजसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या रेकॉर्डमध्ये ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडून काढला.
