पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने भारताला ८ गडी राखून धूळ चारली. शिमरॉन हेटमायर (१३९) आणि शे होप (१०२) यांनी ठोकलेल्या शतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने मालिकेत विजयी सलामी दिली. हेटमायर आणि होप यांच्या फटकेबाजीवर अंकुश लावणं कोणत्याही भारतीय गोलंदाजाला जमलं नाही. या दोघांनी द्विशतकी भागीदारी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजने ४८ व्या षटकातच विजयावर शिक्कामोर्तब केले.

सामन्यात रोहित शर्मा फलंदाजी करत होता. त्यावेळी वेस्ट इंडीजचा कर्णधार कायरन पोलार्ड त्याच्याशी बोलायला आला. पोलार्ड आणि रोहितमध्ये मजेशीर संबाद झाला. संवाद सुरू असताना पोलार्ड हसताना दिसला. पण पोलार्ड तेथून गेल्यावर मात्र रोहितने दुसऱ्या खेळाडूकडे बघून पोलार्डसाठी शिवी दिली. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

वेस्ट इंडीजची विजयी सलामी

भारताने प्रथम फलंदाजी करत २८७ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाची सुरुवात अडखळती झाली. राहुल, रोहित, विराट झटपट बाद झाले. त्यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या दोघांनी भारताचा डाव सावरला. पंतने ७१ तर अय्यरने ७० धावांची खेळी केली. हे दोघे माघारी परतल्यानंतर केदार जाधव आणि रविंद्र जाडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी करत भारताला २८७ धावांचा टप्पा गाठून दिला. कॉट्रेल, पॉल आणि जोसेफ यांनी २-२ तर पोलार्डने १ बळी टिपला.

भारताप्रमाणे विंडीजच्या डावाची सुरुवातही खराब झाली होती. मात्र यानंतर हेटमायर आणि होप जोडीने नेटाने भारतीय गोलंदाजीचा सामना करत मैदानावर आपला जम बसवला. दुसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचत त्यांनी अक्षरश: भारताकडून विजय हिसकावून घेतला. दीपक चहर आणि मोहम्मद शमीने भारताकडून १-१ बळी घेतला.