IND vs WI : भारत आणि विंडीज या दोन संघामध्ये उद्यापासून दुसरी कसोटी मालिका सुरु होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने विंडीजचा एक डाव आणि २७२ धावांनी सहज पराभव केला होता. या सामन्यात भारताकडून नवोदित खेळाडू पृथ्वी शॉ याने सर्वोकृष्ट खेळ केला. त्याने चौकारांची बरसात करत १५४ चेंडूत १३४ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या या खेळीचे साऱ्यांनीच कौतुक केले. कर्णधार विराट कोहलीनेदेखील त्याचे आणि नवोदित खेळाडूंचे कौतुक केले. या नवोदित खेळाडूंचे कौतुक करताना त्याने याचे श्रेय IPLला दिले.

टीम इंडियाच्या विविध मालिकांमध्ये सध्या नवोदित खेळाडूंना संधी दिली जात आहे. या संधी मिळालेले खेळाडू हे अत्यंत प्रतिभावान आहेत. हे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याआधी त्यांना मोठ्या संख्येच्या प्रेक्षकांपुढे खेळण्याचा अनुभव असतो. कारण IPL स्पर्धेत हे खेळाडू खेळलेले आहेत आणि म्हणूनच IPL महत्वाचे आहे, असे तो म्हणाला.

IPLमुळे युवा खेळाडूंना आंतराराष्ट्रीय क्रिकेटचं दडपण येत नाही. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या चाहत्यांपुढे युवा खेळाडू आपला नैसर्गिक खेळ खेळून आपली जागा अधिक भक्कम करतात, हे सुखावह आहे, असेही तो म्हणाला.

दरम्यान, पृथ्वी शॉ याने केलेला खेळ हा त्याच्या प्रतिभेमुळे आहे. त्यामुळे त्याची किंवा त्याच्या खेळाची इतर खेळाडूंशी तुलना करू नका. कारण दिग्गज खेळाडूंशी त्याची तुलना झाली तर त्याला त्याचे दडपण येऊ शकते आणि त्यामुळे त्याच्या नैसर्गिक खेळावर परिणाम होऊ शकतो, असे मतही कोहलीने व्यक्त केले होते.