अँटीग्वा येथे सुरु असलेल्या पहिल्या वन-डे सामन्यात भारताने आपली पकड मजबूत बसवली आहे. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने दुसऱ्या डावात २६० धावांची आघाडी घेतली आहे. त्याआधी पहिल्या डावात भारताने विंडीजला २२२ धावांमध्ये गारद केलं. इशांत शर्माने पहिल्या डावात विंडीजचा निम्मा संघ माघारी धाडला. आपल्या भेदक माऱ्याने इशांत शर्माने क्रेग ब्रेथवेट, रोस्टन चेस, शाई होप, शिमरॉन हेटमायर आणि केमार रोच यांचे बळी घेतले. या धडाकेबाज कामगिरीसह इशांतने हरभजन सिंह आणि अनिल कुंबळे यांच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजमध्ये ५ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची इशांतची ही तिसरी वेळ ठरली. याआधी सुभाष गुप्ते, हरभजन सिंह आणि अनिल कुंबळे यांनी अशी कामगिरी करुन दाखवली होती. इशांतच्या भेदक माऱ्यामुळेच भारताला पहिल्या डावात ७५ धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली.

अवश्य वाचा – Ind vs WI : पहिल्या डावात इशांत शर्माची अनोखी कामगिरी, १३ वर्ष अबाधित विक्रमाशी केली बरोबरी

दरम्यान, पहिल्या डावाच्या तुलनेत भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात आश्वासक खेळ केला. तरीही सलामीवीर मयांक अग्रवालला झटपट माघारी धाडण्यात विंडीज यशस्वी ठरलं. फिरकीपटू रोस्टन चेसने त्याला पायचीत करत माघारी धाडलं. यानंतर लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र ठराविक अंतराने ते ही माघारी परतले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने भारताचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी मोठे फटके खेळण्याचा मोह टाळत खेळपट्टीवर स्थिरावण्याकडे भर दिला. ज्याचा फायदा भारतीय संघाला झालेला पहायला मिळाला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली नाबाद ५१ तर अजिंक्य रहाणे नाबाद ५३ धावांवर खेळत होता. वेस्ट इंडिजकडून दुसऱ्या डावात आतापर्यंत रोस्टन चेसने २ तर केमार रोचने १ बळी घेतला.