भारताचा संघ पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यासाठी त्रिवेंद्रममध्ये दाखल झाला. केरळची राजधानी असलेल्या त्रिवेंद्रम येथे विराट आणि संघाची एका सुंदर रिसॉर्टमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. या रिसॉर्टच्या आदरातिथ्यामुळे विराट खुश झाला. त्यामुळे त्याने केरळ आणि त्याच्या संस्कृतीचे कौतुक करणारा एक संदेश (अभिप्राय) हॉटेलच्या व्हिजीटर्स बुकमध्ये लिहिला.

केरळ हे राज्य अगदी पाहिल्याप्रमाणेच शांत, आल्हाददायक आणि फिरण्याच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित असेच आहे, असे विराटने आपल्या संदेशात म्हटले आहे. केरळात येणे हे माझ्यासाठी अत्यंत आनंददायी असते. मला केरळात यायला खूप आवडते आणि या परिसरातील सकारात्मक उर्जा माझ्यात स्फुरण भरते. केरळाचे सौंदर्य केवळ पाहून चालत नाही, तर ते स्वतः अनुभवावे लागते. त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी केरळात येऊन येथील वातावरण अनुभवायला हवे. हे राज्य फिरण्यासाठी आणि राहण्यासाठी सुरक्षित आहे, असेही त्याने संदेशात म्हटले आहे.

केरळमध्ये काही महिन्यांपूर्वी आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते आणि केरळ जवळपास उद्धवस्त झाले होते. त्यामुळे केरळमध्ये पर्यटनासाठी जाण्याचा लोकांचा ओढा कमी झाला होता. त्यामुळे ‘केरळ हे राज्य फिरण्यासाठी एकदम सुरक्षित आहे. तुम्ही येथे या आणि बिनधास्त फिरा’, असा खास संदेश विराटने पर्यटकांना दिला आहे.

या मालिकेत भारताने २-१ने आघाडी मिळवली आहे. आता या अंतिम सामन्यात भारत जिंकतो का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे.