रायपूर : स्मृती मनधानाच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ नव्या मोहिमेला आज, शुक्रवारपासून प्रारंभ करणार असून तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत त्यांची झिम्बाब्वेशी गाठ पडणार आहे. आगामी महत्त्वाच्या स्पर्धांच्या दृष्टीने भारतीय संघाला खेळातील उणिवा दूर करण्याची ही महत्त्वाची संधी आहे.
आशियात वर्चस्व राखणार्या भारतीय महिला संघाला जागतिक स्तरावर मात्र ट्वेन्टी-२० प्रारूपात सातत्याने चांगली कामगिरी करता आलेली नाही. सलग दोन ट्वेन्टी-२० विश्वचषकांतील निराशाजनक कामगिरीनंतर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत सुधारणा करण्याचे आव्हान संघासमोर आहे.
मनधाना आणि शफाली वर्मा या सलामीच्या फलंदाजांकडून भारताला आक्रमक सुरुवात मिळते. मात्र, मधल्या षटकांत धावांचा वेग कायम राखण्यात संघाला अडचणी येत असल्याचे गेल्या काही काळात दिसून आले आहे. जायबंदी जेमिमा रॉड्रिग्जच्या अनुपस्थितीत तिसर्या क्रमांकावरील अनिश्चितता आणि माजी कर्णधार हरमनप्रीत कौर हिची अलीकडच्या कामगिरी हेही चिंतेचे विषय आहेत. यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोष अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यात सक्षम असली, तरी तिला अन्य फलंदाजांकडून साथ गरजेची आहे.
वेगवान गोलंदाजांकडून प्रभावी कामगिरी होणे आवश्यक आहे. नंदनी शर्मा हिची प्रगती भारतासाठी सकारात्मक बाब आहे. फिरकी गोलंदाज श्री चरणी आणि अनुभवी दीप्ती शर्मा यांच्याकडूनही दर्जेदार कामगिरीची अपेक्षा असेल. निक्की प्रसाद आणि जिंतिमणी कलिता या नव्या खेळाडूंनाही आपली क्षमता सिद्ध करण्यास मिळू शकते. आगामी स्पर्धांच्या तयारीसाठी युवा खेळाडूंना अनुभव देणे भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
पहिलीच द्विपक्षीय मालिका
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील ही पहिली द्विपक्षीय मालिका असल्याने दोन्ही संघांसाठी ती महत्त्वाची आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत सातत्याने प्रगती केली. आता यात सातत्य राखण्याचे आव्हान मनधानापुढे आहे. रायपूर येथील ट्वेन्टी-२० मालिकेनंतर वडोदरा येथे तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.
संघ
भारत : स्मृती मनधाना (कर्णधार), शफाली वर्मा, निक्की प्रसाद, हरमनप्रीत कौर, अनुष्का शर्मा, रिचा घोष (यष्टिरक्षक), जी. कमलिनी, दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, नंदनी शर्मा, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, जिंतीमणी कलिता, मिन्नू मणी.
झिम्बाब्वे : जोसेफिन एनकोमो (कर्णधार), बिलोव्हड बिझा, चिपो मुगेरी-तिरिपानो, केलिस एनधूलोवु, मिशेल मावुंगा, फ्रान्सिस्का चिपारे, ऑलिंडर चारे, कुडझाई चिगोरा, न्याशा ग्वांझुरा, नोमवेलो सिबांडा, लॉरिन फिरी, चियेदझा धुरूरू, मॉडेस्टर मुपाचिक्वा, तेन्डाइ माकुशा, शार्ने मेयर्स.
* वेळ : सायंकाळी ७ वा.
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १,
१ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.
