Shreyas Iyer On Vaibhav Sooryavanshi: आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघ आता झिम्बाब्वेचा सामना करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतही श्रेयस अय्यर भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी देखील ॲक्शनमध्ये असणार आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत वैभव सूर्यवंशी पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. आता झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या मालिकेआधी कर्णधार श्रेयस अय्यरने वैभव सूर्यवंशीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

इंग्लंडविरुद्ध झालेला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर झालेल्या पुढील चारही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सुमार कामगिरीनंतरही झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. वैभव सूर्यवंशीला देखील या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत वैभवला अवघ्या ४२ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे वैभवला जर स्वतःला सिद्ध करायचं असेल, तर या मालिकेत धावा करणं गरजेचं असणार आहे.

श्रेयस अय्यर काय म्हणाला?

पहिल्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, “मला पूर्ण विश्वास आहे की, युवा खेळाडू आपल्या चुकांमधून शिकतील आणि चांगली कामगिरी करतील. इंग्लंडविरुद्धची मालिका झाल्यानंतर त्याला पुरेशी विश्रांती मिळाली आहे. त्याने आपल्या फलंदाजीचं विश्लेषण केलं असावं. त्याने आपल्या चुका ओळखून, त्यात सुधारणा केली असावी. त्यामुळे त्याला सल्ला देण्याची गरज आहे, असं मला मुळीच वाटत नाही.”

आयर्लंड दौऱ्यासाठीही वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. पण या मालिकेत त्याला एकही सामना खेळायची संधी दिली गेली नव्हती. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर त्याला पदार्पणाची संधी दिली गेली होती. त्याला संघात स्थान देण्यासाठी संजू सॅमसनला संघाबाहेर करण्यात आलं होतं. आयपीएल गाजवलेल्या वैभव सूर्यवंशीकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण तो हवी तशी कामगिरी करू शकला नव्हता. तो १४,१३ आणि १५ अशा धावा करून माघारी परतला. आता झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या मालिकेत त्याचाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.