India vs Zimbabwe Pitch Report: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला भारतीय संघ सुपर ८ फेरीतील दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेचा सामना करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा सामना २६ फेब्रुवारीला चेन्नई9तील एमए चिंदबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने साखळी फेरीतील चारही सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. पण सुपर ८ फेरीत भारताला अपेक्षेप्रमाणे सुरूवात करता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाला ७६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान झिम्बाब्वेविरूद्ध होणाऱ्या सामन्यात खेळपट्टी कोणाला साथ देणार? जाणून घ्या पिच रिपोर्ट.

भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत ज्या ज्या खेळपट्टीवर फलंदाजी केली आहे, त्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं मुळीच सोपं राहिलेलं नाही. भारतीय संघात एकापेक्षा एक स्टार फलंदाज आहेत. पण एकही फलंदाज मनमोकळेपणाने फलंदाजी करू शकलेला नाही. सर्व फलंदाज संघर्ष करताना दिसून आले आहेत. चेपॉकची खेळपट्टी ही स्लो असते. त्यामुळे झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुजारबानी आणि सिकंदर रझासारख्या खेळाडूंसाठी हे फायदेशीर ठरू शकतं. तसेच ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठीही फायदेशीर ठरते.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, वर्ल्डकप स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी मैदानाची खुदाई करण्यात आली होती. गेल्या ५ महिन्यांपासून या खेळपट्टीवर एकही सामना खेळवण्यात आलेला नाही. त्यामुळे ही खेळपट्टी पूर्णपणे ताजी असणार आहे. या खेळपट्टीवर चेंडू बॅटवर चांगल्याप्रकारे येत आहे. याआधी न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान अफगाणिस्तानने पहिल्या डावात फलंदाजी करताना १८२ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडने हे आव्हान अवघ्या १७.५ षटकात पूर्ण केलं होतं. त्यानंतर यूएईविरूद्ध झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने १७५ धावांचे आव्हान १५.२ षटकात पूर्ण केले होते. याच मैदानावर खेळताना कॅनडाच्या युवराज सामराने दमदार शतकी खेळी केली होती.

चेपॉकच्या मैदानावरील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. पण यावेळी उलट चित्र पाहायला मिळालं आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी १९६ आणि २०० धावांचा यशस्वी बचाव केला आहे. त्यामुळे कुठलाही कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. भारतीय संघात एकापेक्षा एक स्फोटक फलंदाज आहेत. त्यामुळे सूर्यकुमार यादव नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो. भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या उभारून झिम्बाब्वेला लवकरात लवकर ऑलआऊट करण्याचा प्रयत्न करतील.