IND W vs ENG W 1st T20I Highlights in Marathi: महिला टी-२० विश्वचषकासाठी भारताचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडिया आणि इंग्लंड महिला संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत पहिल्या सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने धमाकेदार सुरूवात केली आहे. पहिल्याच टी-२०मध्ये इंग्लंडचा भारताने ३८ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दोन वर्षांनंतर टी-२० सामना खेळणाऱ्या खेळाडूने संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
हरमनप्रीत कौरला पहिल्या टी-२० सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती, त्यामुळे तिच्या अनुपस्थितीत स्मृती मानधनाने संघाचं नेतृत्त्व केलं आणि संघाला विजयही मिळवून दिला. इंग्लंडविरुद्धच्या भारताच्या विजयात जेमिमा रॉड्रिग्स आणि यास्तिका भाटिया यांचे मोठं योगदान होतं. या सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या नंदिनी शर्मानेही गोलंदाजीने खळबळ उडवून दिली.
चेम्सफोर्ड येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारताची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. त्यांच्या दोन्ही सलामीवीर – स्मृती मानधाना आणि शफाली वर्मा पहिल्याच षटकात बाद झाल्या. स्मृतीला आपलं खातदेखील उघडता आलं नाही आणि शफालीला फक्त दोन धावा करता आल्या. पण त्यानंतर, यस्तिका भाटिया आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी मिळून अशी उत्कृष्ट कामगिरी केली की भारताने पॉवरप्लेमध्ये इंग्लंडविरुद्ध आपली आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या उभारली. भारताने पहिल्या सहा षटकांत दोन गडी गमावून ७३ धावा केल्या.
जेमिमा यस्तिकाची १२६ धावांची विक्रमी भागीदारी
पॉवरप्लेमध्ये भारताचा डाव सावरल्यानंतर, यास्तिका भाटिया आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी आपला वेग कायम ठेवला. परिणामी, त्यांनी महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील तिसऱ्या विकेटसाठीच्या सर्वोच्च भागीदारीचा भारतीय विक्रम मोडला. महिलांच्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी साकारण्याचा विक्रम यापूर्वी वेदा कृष्णमूर्ती आणि जेमिमा रॉड्रिग्स या भारतीय जोडीच्या नावावर होता. त्यांनी २० नोव्हेंबर २०१९ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध ११७ धावा जोडल्या होत्या.
आता, सात वर्षांनंतर, यस्तिका भाटिया आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी १२६ धावांची भागीदारी करून तो विक्रम मोडला. विशेष म्हणजे, या दोन्ही भागीदारींमध्ये जेमिमा रॉड्रिग्सचा सहभाग होता. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात, जेमिमा रॉड्रिग्जने १७२.५० च्या स्ट्राईक रेटने ४० चेंडूंमध्ये ६९ धावा केल्या. तर २०२४ नंतर पहिला टी-२० सामना खेळणाऱ्या यास्तिका भाटियाने ४० चेंडूंमध्ये ५४ धावा केल्या. या दोघींव्यतिरिक्त, सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या दीप्ती शर्माने १३ चेंडूंमध्ये २२ धावांची वेगवान खेळी केली. भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १८८ धावा केल्या.
१८९ धावांचे लक्ष्य गाठताना इंग्लंडने अवघ्या ३७ धावांत आपले दोन्ही सलामीवीर गमावले. वेगवान गोलंदाज क्रांती गौडने इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीर डंकले आणि कॅप्सी यांच्या विकेट्स घेतल्या. ता्यानंतर एमी जोन्सने ४८ चेंडूंमध्ये ६७ धावा करून इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा केल्या. मात्र, इतर कोणताही फलंदाज २५ धावांचा टप्पा गाठू शकला नाही. यष्टीरक्षक-फलंदाज एमी जोन्सला पदार्पण करणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाज नंदिनी शर्माने बाद केलं. या मोठ्या विकेटव्यतिरिक्त, नंदिनी शर्माने खालच्या फळीतील दोन खेळाडू, डॅनी गिब्सन आणि इस्सी वोंग यांनाही बाद केलं.
भारतासाठी नंदिनी शर्मा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली, तिने ४ षटकांत ३४ धावा देऊन ३ बळी घेतले. क्रांती गौडनेही २ बळी घेतले, तर श्री चरणी आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. इंग्लंडच्या १८९ धावांच्या प्रत्युत्तरात, भारत २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १५० धावाच करू शकला. जेमिमा रॉड्रिग्जला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
