Sayali Satghare: भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ऐतिहासिक डे – नाईट कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. पर्थच्या वाका मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय संघाला पहिल्या दिवशी फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पण गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांची जादू पाहायला मिळाली. १९८ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. भारतीय संघाकडून आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या सायली सतघरे दमदार गोलंदाजी केली. तिने स्विंग होणारा चेंडू टाकून ऑस्ट्रेलियन फलंदाजाची दांडी गुल केली आणि आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिला विकेट घेतला.

हा डे- नाईट कसोटी सामना आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीतून मदत मिळत आहे. पहिलाच सामना खेळत असलेल्या सायली सतघरेने अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अडचणीत टाकलं. जॉर्जिया वोलला बाद करत तिने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिला विकेट घेतला. तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरू असताना तिसरे षटक टाकण्यासाठी सायली सतघरे गोलंदाजीला आली. या षटकातील दुसरा चेंडू तिने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. हा चेंडू टप्पा पडताच स्विंग होऊन आत आला आणि लेग स्टंप उडवून गेला. त्यामुळे जॉर्जिया वोलचा डाव अवघ्या २ धावांवर आटोपला. या भन्नाट चेंडूचा व्हिडिओ सोशल मीडियावर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भारतीय संघाने केल्या १९८ धावा

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा डाव १९८ धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना शफाली वर्माने ३५ धावांची खेळी केली. तर प्रतिका रावलने १८ धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जने ५२ धावांची खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर १९ धावा करून माघारी परतली. ऋचा घोषने ११ धावा केल्या. शेवटी काश्वी गौतमने नाबाद ३४ धावांची खेळी केली.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना एलिस पेरीने ७६ धावांची खेळी केली. पहिल्या डावात फलंदाजी करताना अॅनाबेल सदरलँडने देखील मोठी खेळी केली आहे.