India W vs Australia W 1st Test: भारताची महिला फलंदाज शुभा सतीशच्या बोटात फ्रॅक्चर आणि हाड मोडल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यात तिला खेळणे अवघड झाले आहे. शुभाने इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सर्वाधिक ६९ धावा करण्याबरोबरच जेमिमाह रॉड्रिग्जला साथीला घेत तिने ११५ धावांची भक्कम भागीदारी केली होती. भारताने तीन दिवसांत हा कसोटी सामना विक्रमी ३४७ धावांनी जिंकला.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी पदार्पणातच अर्धशतक झळकावणाऱ्या या फलंदाजाच्या दुखापतीबाबत कर्णधार हरमनप्रीत कौरने शनिवारी ही माहिती दिली. बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे शुभा शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजीला आली नव्हती. ती क्षेत्ररक्षणासाठी देखील मैदानात आली नव्हती. तिच्या दुखापतीमुळे संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढली आहे.

कर्णधार हरमनप्रीत कौरने शुभाचे खूप कौतुक केले होते. इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर हरमनप्रीत म्हणाली होती, “आमचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी आम्हाला खूप मदत केली. मला कसोटीत संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव नव्हता. मला त्यांच्या (मजुमदार) निर्णयांवर विश्वास होता, मग शुभाला (सतीश) पहिल्या डावात वन-डाऊन पाठवणे असो किंवा गोलंदाजीत त्याने जे काही बदल सुचवलेले असो. उदाहरणार्थ, जसे की आज पहिली ४० मिनिटे महत्त्वाची होती, या सर्व कल्पना त्यांच्या कल्पना होत्या. सकाळच्या परिस्थितीचा उपयोग कर असे त्यांनी सांगितले.”

हरमनप्रीत म्हणाली, “याचे श्रेय गोलंदाजांनाही जाते. त्यांना जी फील्ड सेट करून दिली होती, त्यानुसार त्यांनी गोलंदाजी केली. तुमचे गोलंदाज जेव्हा योग्य ठिकाणी गोलंदाजी करू शकतात तेव्हा तुमचे काम सोपे होते.” हरमनप्रीतने पदार्पणाच्या कसोटीतच पहिल्या डावात ६९ धावा करणाऱ्या शुभाचे कौतुक केले आणि त्यात पुन्हा एकदा मुझुमदारांच्या भूमिकेचा उल्लेख केला. ती म्हणाला, “शुभाने आम्हाला खूप चांगली सुरुवात केली. हाही आमच्या प्रशिक्षकाचा निर्णय होता. एनसीएमध्ये सराव करताना त्यांनी तिला फलंदाजी करताना आणि डावाला पुढे नेताना पाहिले होते.”

हेही वाचा: IND vs SA 1st ODI: आवेश-अर्शदीपच्या गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकन फलंदाज ढेपाळले, टीम इंडियासमोर केवळ ११७ धावांचे लक्ष्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीम इंडियाची कर्णधार पुढे म्हणाली, “मुझुमदार म्हणाले की जर आम्ही तिला वन-डाउन पाठवू शकलो तर ती आम्हाला चांगली सुरुवात देऊ शकते. शुभाने देखील आम्हाला तिच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्याप्रमाणे तिने कामगिरी केली.” पुढील आठवड्यात वानखेडे स्टेडियमवर २१ ते २४ डिसेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्‍या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाच्या दृष्टिकोनात कोणताही बदल होणार नसल्याचे भारतीय कर्णधाराने सांगितले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकमेव कसोटी सामना २१ ते २४ डिसेंबर दरम्यान वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.