Shree Charani Record: महिला आशिया चषक २०२६ स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करून ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठीआ आलेल्या भारतीय संघाकडून शफाली वर्माने तुफान फटकेबाजी करून अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने १४९ धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा बचाव करताना युवा फिरकी गोलंदाज श्री चरणीने एकमेव गडी बाद केला. या कामगिरीच्या बळावर तिने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात बांगलादेशचा संघ १५० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. यादरम्यान श्री चरणीने बांगलादेशची सलामीवीर फलंदाज जुएरिया फर्दोसला ऋचा घोषच्या हातून झेलबाद करत माघारी धाडलं. हा तिच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५० वा विकेट ठरला. यासह तिने एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. श्री चरणी ही टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात ५० गडी बाद करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. श्री चरणीने वय २२ वर्ष ३७ दिवस असताना ५० गडी बाद केले आहेत. तर राधा यादवने २० वर्ष ३३४ दिवस इतकं वय असताना हा खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. तर दीप्ती शर्माने वय २२ वर्ष १८७ दिवस इतकं असताना ५० गडी बाद केले होते.
या यादीत अव्वल स्थानी असलेल्या सोफी एक्लेस्टोनने वय २० वर्ष ३०० दिवस इतकं असताना टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. तर राधा यादव या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर अमेलिया केरने २१ वर्ष ३५४ दिवस इतकं वय असताना ५० गडी बाद केले होते. तर श्री चरणी या स्टार खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचली आहे.
भारतीय संघाचा एकतर्फी विजय
या सामन्यात बांगलदेशने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांअखेर १४९ धावा केल्या. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना शफाली वर्माने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. तर हरमनप्रीत कौरने २४, प्रतिका रावलने २० आणि ऋचा घोषने २१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशकडून शोरना अक्तेरने २२ आणि दिलारा अक्तेरने २१ धावा केल्या. बांगलादेशला २० षटकांअखेर ७ गडी बाद १०९ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह भारतीय संघाने हा सामना ४० धावांनी आपल्या नावावर केला.
