भारतीय महिला संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना जोहान्सबर्गमध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ७ गडी बाद १५७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वॉल्डवर्टने दमदार अर्धशतकी खेळी केली. तर शेवटी डर्कसनने ४१ धावांची खेळी करून दक्षिण आफ्रिकेला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.

दक्षिण आफ्रिकेचा विजय

दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १५८ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना लॉरा वॉल्डवर्टने ३९ चेंडूत ५१ धावांची खेळी करून दमदार सुरुवात करून दिली. तर लुसने १३ धावा केल्या. तजमीन ब्रिट्सने १० धावा केल्या. अनेरी डर्कसेन शेवटपर्यंत उभी राहिली. तिने २८ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराचा साहाय्याने नाबाद ४१ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेने हा सामना ५ चेंडू शिल्लक ठेवून ६ गडी राखून आपल्या नावावर केला.

भारतीय संघाला या २ चुका महागात पडल्या…

शेवटचे २ षटक शिल्लक असताना दोन्ही संघांना विजय मिळवण्याची संधी होती. १८ व्या षटकात श्रेयांका पाटील गोलंदाजी करत असताना, रेणुका सिंगने सोपा झेल सोडला. त्यानंतर १९ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अनुष्का शर्माकडून झेल सुटला. हे झेल जर पकडले गेले असते, निकाल वेगळा लागू शकला असता.

भारतीय संघाने केल्या १५७ धावा

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना सलामीला आलेल्या शेफाली वर्माने ३४ धावांची खेळी करून दमदार सुरुवात करून दिली. तर स्मृती मानधना १३ धावांवर माघारी परतली. कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद ४७ धावांची खेळी केली. तिला जेमिमा रॉड्रिग्जने चांगली साथ दिली. जेमिमाने ३६ धावांचे योगदान दिले. शेवटी काश्वी गौतमने १० धावा केल्या. यासह भारतीय संघाने २० षटकांअखेर ७ गडी बाद १५७ धावा केल्या.