India-W vs Zimbabwe-W: झिम्बाब्वेचा महिला क्रिकेट संघ भारतीय महिला क्रिकेट संघाचा सामना करण्यासाठी पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आला आहे. या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रायपूरच्या मैदानावर पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना झिम्बाब्वेने २० षटकांअखेर ५ गडी बाद ११४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला सुरूवातीला मोठे धक्के बसले होते. पण शेवटी दीप्ती शर्मा आणि पहिलाच सामना खेळत असलेल्या निकी प्रसादने महत्वपूर्ण खेळी केली आणि भारतीय संघाला ४ गडी राखून विजय मिळवून दिला.

सुरूवातीला पडझड, पण शेवटी विजय

या सामन्यात भारतीय संघाला अवघ्या ११५ धावा करायच्या होत्या. भारतीय संघाचा मजबूत फलंदाजीक्रम पाहता, हे आव्हान फार मोठं नव्हतं. पण भारतीय संघाला सुरूवातीलाच मोठे धक्के बसले. कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळत असलेली स्मृती मानधना अवघ्या ९ धावा करून माघारी परतली. त्यानंतर शफाली वर्मा ४ धावांवर माघारी परतली. तर अनुष्का शर्मा ४ धावांवर माघारी परतली. भारतीय संघाची माजी कर्णधार हरमनप्रीत कौरही या सामन्यात फ्लॉप ठरली. ती केवळ १ धाव करून माघारी परतली. पण शेवटी निकी प्रसाद आणि दीप्ती शर्माने मिळून भारतीय संघाचा डाव सावरला. दीप्ती शर्माने ४९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर निकी प्रसाद शेवटपर्यंत टिकून राहिली आणि भारतीय संघाला ४ गडी राखून विजय मिळवून दिला.

झिम्बाब्वेने केल्या ११५ धावा

झिम्बाब्वेचा संघ पहिल्यांदाच भारतीय संघाविरुद्ध मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. पण पहिल्याच सामन्यात झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. सलामीला आलेली बिझा शून्यावर माघारी परतली. पण न्दलोवूने ४२ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर मुपाचिकवाने १४ धावांचे योगदान दिले. शेवटी फलंदाजी करताना मेयर्सने नाबाद ४३ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर झिम्बाब्वेने ११५ धावांपर्यंत मजल मारली.

मालिकेत १-० ची आघाडी, दुसरा सामना कधी

दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना रविवारी खेळवला जाणार आहे. हा सामना देखील रायपूरमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.