IND-W vs ZIM-W, Niki Prasad Catch: झिम्बाब्वेचा महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आला आहे. भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला आणि ऐतिहासिक टी-२० सामना रायपूरमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात २० वर्षीय निकी प्रसादला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात तिने डाईव्ह मारून भन्नाट झेल घेण्याचा प्रयत्न केला, पण झेल घेतल्यानंतर अंपायरने फलंदाजाला नाबाद घोषित केलं.
तर झाले असे की, भारतीय संघाची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून पाहुण्या झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वेला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. सलामीवर बिजा शून्यावर माघारी परतली. त्यांतर मुपाचिकवा आणि न्दलोवूने मिळून झिम्बाब्वेचा डाव सांभाळला. दरम्यान न्दलोवू अर्धशतकाच्या अगदी जवळ पोहोचली होती. त्यामुळ तिने मोठे फटके खेळणं टाळलं.
यादरम्यान डावातील १५ वे षटक टाकण्यासाठी अरूंधती रेड्डी गोलंदाजीला आली. अरूंधती रेड्डीने बॅक ऑफ द हँड स्लोवर चेंडू टाकण्यावर अधिक भर दिला. त्यामुळे मोठे फटके खेळणं मुळीच सोपं नव्हतं. तिने षटकातील पाचवा चेंडू स्लो टाकला. या चेंडूवर न्दलोवूने मोठा फटका मारला. चेंडू हवेत उंच गेला, त्यावेळी निकी प्रसाद लाँग ऑफवरून वेगाने धावत आली आणि डाईव्ह मारून हवेतच भन्नाट कॅच घेतला. झेल घेतल्यानंतर, खेळाडूंनी जल्लोष केला आणि फलंदाज मैदानाबाहेर गेली होती. पण इतक्यात अंपायरने तिला पुन्हा बोलावलं. तिसऱ्या अंपायरने कॅच पूर्ण झाला आहे की नाही, हे तपासून पाहण्यासाठी बराच वेळ घेतला. शेवटी तिला नॉट आऊट घोषित केलं. फलंदाज नॉट आऊट राहिली, पण निकी प्रसादने झेल घेण्याचा जो प्रयत्न केला, त्याचं जोरदार कौतुक होत आहे.
कोण आहे निकी प्रसाद?
अवघ्या २० वर्षांची निकी प्रसाद ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक संघाकडून खेळते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून तिने भारतीय संघात आपलं स्थान निश्चित केलं. महिला प्रीमियर लीग स्पर्धेत तिने दिल्ली कॅपिटल्स संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत खेळताना तिने १८ सामन्यातील ७ डावात ३०.६० च्या सरासरीने १५३ धावा केल्या आहेत.
