IND vs SL 1st Test 600th Match Galle Independence Day Flag Hoisting: आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. भारतीय क्रिकेट संघ यादरम्यान श्रीलंका दौऱ्यावर असून आजपासून कसोटी मालिकेला सुरूवात आहे. यापूर्वी भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त श्रीलंकेतील गॉल इंटरनॅशनल स्टेडियमवर टीम इंडियाने तिरंगा फडकावून स्वातंत्र्यदिन साजरा केला. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने राष्ट्रध्वज फडकावत देशाप्रती अभिमान व्यक्त केला.

भारतीय संघातील सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ या विशेष सोहळ्यासाठी मैदानावर एकत्र आले होते. परदेशात असतानाही देशाचे प्रतिनिधित्व करत स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा हा क्षण संघासाठी विशेष ठरला. भारताचा कसोटी कर्णधार शुबमन गिल व प्रशिक्षक गौतम गंभीर ध्वजाजवळ उभे होते. तर शुबमनने ध्वजारोहण केलं. यानंतर संपूर्ण संघ, सपोर्ट स्टाफ व इतर मंडळींनी एकत्र राष्ट्रगीत गायलं. बीसीसीआयने हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून गॉलमध्ये सुरुवात झाली आहे. ही मालिका ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ चक्राचा भाग आहे. गॉलमध्ये तिरंगा डौलाने फडकावल्यानंतर आता शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया स्वातंत्र्यदिनाची हीच ऊर्जा मैदानावर दाखवण्यास सज्ज झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेची विजयी सुरुवात करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपली स्थिती मजबूत करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

शुबमन गिलने सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर श्रीलंकेचा संघ गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल. स्वातंत्र्यदिनाच्या खास दिवशीच म्हणजे आज भारतीय संघ आपला ६००वा कसोटी सामनादेखील खेळणार आहे. ६०० कसोटी सामने खेळणारा भारत हा तिसरा देश आहे. त्यांच्याआधी या यादीत इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचे संघ आहेत.

६००व्या ऐतिहासिक कसोटीत भारतीय संघाचं नेतृत्त्व करण्याची संधी मिळाल्याबाबत कर्णधार शुबमन गिल म्हणाला, “माझ्यासाठी हा खूप मोठा सन्मान आहे. प्रत्येक वेळी देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळणं ही अभिमानाची गोष्ट असते आणि यावेळी तर हा प्रसंग आणखी खास आहे. कारण आज आपला स्वातंत्र्यदिन आहे आणि भारताचा हा ६००वा कसोटी सामना आहे. त्यामुळे या सामन्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

भारताची प्लेईंग इलेव्हन

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा