scorecardresearch

भारत-श्रीलंका कसोटी मालिका : पंतचा झटपट पंथ! ; भारताची ६ बाद ३५७ अशी शानदार मजल; विहारीचे अर्धशतक

ऋषभने काढलेल्या ९६ धावांच्या बळावर भारताने पहिल्या कसोटी सामन्याच्या दिवशी ६ बाद ३५७ अशी शानदार मजल मारली.

ऋषभ पंत ९६ ( चेंडू ९७ चौकार ९ षटकार ४)

मोहाली : विराट कोहलीच्या शतकी कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर ऋषभ पंतच्या फटकेबाजीने छाप पाडली. श्रीलंकेच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला करीत ऋषभने काढलेल्या ९६ धावांच्या बळावर भारताने पहिल्या कसोटी सामन्याच्या दिवशी ६ बाद ३५७ अशी शानदार मजल मारली.

कोहलीचा १०० वा कसोटी सामना पाहण्यासाठी पाच हजार क्रिकेटरसिकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळाला होता. कोहलीने डावाला उत्तम सुरुवात केली. परंतु ४५ धावांवर तो बाद होताच शांतता पसरली. चेतेश्वर पुजाराच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळालेल्या हनुमा विहारीने ५८ धावांचे योगदान दिले. याचप्रमाणे पाचव्या क्रमांकावरील पंतने ९७ चेंडूंत ९ चौकार आणि ४ षटकारांनिशी शतकाकडे वाटचाल केली. पण नव्वदीच्या फेरीत तो पाचव्यांदा अपयशी ठरला. सुरंगा लकमलने ९६ धावांवर पंतचा त्रिफळा उडवला. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे फलंदाजीला क्रमवारी देण्याचे हे दोन निर्णय यशस्वी ठरले. श्रीलंकेकडून डावखुरा फिरकी गोलंदाज लसिथ एम्बुल्डेनियाने (२८-२-१०७-२) प्रभावी गोलंदाजी केली. पण पंतने त्याच्या एका षटकात २२ धावा काढत लय बिघडवली.

सकाळी रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. रोहित (२९) आणि मयांक अगरवाल (३३) यांनी ५२ धावांची सलामी दिली. दोन्ही सलामीवीर तंबूत परतल्यानंतर विहारी आणि कोहली यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ९० धावांची भागीदारी करीत धावसंख्येला स्थैर्य दिले. एम्बुल्डेनियाने कोहलीचा त्रिफळा उडवल्यानंतर विहारीसुद्धा माघारी परतला. त्यानंतर पंत आणि श्रेयस अय्यर (२७) यांनी पाचव्या गडय़ासाठी ५३ धावांची भागीदारी उभारली. धनंजय डिसिल्व्हाने श्रेयसला पायचीत करीत जोडी फोडली. मग पंतने आक्रमणाचा वेग वाढवला. कसोटी क्रिकेटमध्ये ट्वेन्टी-२० क्रिकेटचीच लज्जत यामुळे चाहत्यांना अनुभवता आली. पंत आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या गडय़ासाठी १०४ धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा जडेजा ४५ आणि रविचंद्रन अश्विन १० धावांवर खेळत होते.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ८५ षटकांत ६ बाद ३५७ (ऋषभ पंत ९६, हनुमा विहारी ५८; लसिथ एम्बुल्डेनिया २/१०७)

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India 357 for 6 at stumps on day 1 in first test against sri lanka zws

ताज्या बातम्या