India A vs Afghanistan A: भारतीय अ संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारत अ, श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ या तिन्ही संघांमध्ये तिरंगी मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेत बुधवारी झालेल्या सामन्यात भारत अ आणि अफगाणिस्तान अ हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हा सामना भारतीय अ संघाने १०१ धावांनी आपल्या नावावर केला. यासह भारताचा संघ ४ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्यामुळे भारतीय संघ अंतिम सामना खेळणार, हे जवळजवळ निश्चित झालं आहे. तर दुसरा संघ कोणता? हे अजूनपर्यंत ठरलेलं नाही. अफगाणिस्तान अ आणि श्रीलंका अ या दोन्ही संघांमध्ये निर्णायक लढत होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल.

भारतीय अ संघाचा दमदार विजय

भारत अ आणि अफगाणिस्तान अ या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने १०१ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने ४ गुणांची कमाई केली आहे. तसेच अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने हरवल्यामुळे भारतीय संघाचा नेट रनरेटही वाढला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० षटकांअखेर ९ गडी बाद ३१९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तान अ संघाचा डाव अवघ्या २१९ धावांवर आटोपला.

सध्या गुणतालिकेत अफगाणिस्तान अ चा संघ तिसऱ्या स्थानी आहे. अफगाणिस्तान अ संघाला ३ पैकी केवळ १ सामना जिंकता आला आहे. हा सामना भारताविरूद्ध खेळताना जिंकला होता. त्यामुळे अफगाणिस्तान अ संघाने आतापर्यंत केवळ २ गुणांची कमाई केली आहे. अफगाणिस्तानला जर अंतिम फेरीत प्रवेश करायचा असेल, तर श्रीलंका फक्त हरवून चालणार नाही. तर मोठ्या फरकाने हरवावं लागणार आहे. २ पराभवांमुळे अफगाणिस्तान अ संघाचा नेट रनरेट -१.९८३ इतका घसरला आहे. जर अफगाणिस्तानने हा सामना कमी फरकाने जिंकला, तर श्रीलंकेचा संघ पराभूत होऊनही अंतिम सामन्यात प्रवेश करेल.

अंतिम सामना केव्हा होणार? वैभव खेळणार का?

गुणतालिकेची स्थिती पाहता, भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ अंतिम फेरी खेळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गेल्यावेळी जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते, त्यावेळी वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला होता. त्याच्यावर बंदी घातली जाणार असल्याची चर्चा रंगली होती. पण असं काहीच झालेलं नाही. त्यामुळे वैभव या सामन्यात खेळताना दिसेल. हा सामना २१ जूनला खेळवला जाणार आहे. या सामन्यात वैभव कशी कामगिरी करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे .