India A beat India D in 2nd Round of Duleep Trophy 2024: दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात भारत ए संघाने भारत डी संघाचा १८६ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. ४८८ धावांच्या विशाल लक्ष्याला प्रत्युत्तर देताना श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत डी संघ सामन्याच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी केवळ ३०१ धावाच करू शकला. दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इंडिया डी चा हा सलग दुसरा पराभव आहे. भारत ए च्या या विजयात एक नाही तर अनेक खेळाडू हिरो ठरले. उदाहरणार्थ, प्रथम सिंग आणि तिलक वर्मा यांनी दुसऱ्या डावात शतके झळकावली. तनुष कोटियनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. पहिल्या डावात ८९ धावा करणाऱ्या शम्स मुलानीने दुसऱ्या डावात ३ मोठे विकेट घेत इंडिया डी संघाचे कंबरडे मोडले. दुसरीकडे, भारत सी आणि भारत बी यांच्यात खेळला जाणारा दुसरा सामना अनिर्णित राहिला.

हेही वाचा – Rohit Sharma: “रोहित तंत्रकुशल नाही, तो कठोर सरावही करत नाही”, जॉन्टी ऱ्होड्स रोहित शर्माबद्दल नेमकं काय म्हणाला? सचिनचा उल्लेख करत म्हणाला…

प्रथम सिंह-तिलक वर्माचे शतक

तिलक वर्मा आणि प्रथम सिंह यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारत ए संघाने शनिवारी दुलीप ट्रॉफी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आपला दुसरा डाव तीन बाद ३८० धावांवर घोषित केला आणि भारत डी संघाला विजयासाठी ४८८ धावांचे डोंगराएवढे मोठे लक्ष्य दिले. तिलकने १९३ चेंडूंत १११ धावांच्या नाबाद खेळीत नऊ चौकार मारले, तर सलामीवीर प्रथमने १८९ चेंडूंच्या खेळीत १२ चौकार व एक षटकारासह १२२२ धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

हेही वाचा – माजी भारतीय क्रिकेटपटूची अवघ्या महिनाभरात केनिया संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी, अंतर्गत वादाचा फटका

तनुष कोटीयन, शम्स मुलानीची भेदक गोलंदाजी

फिरकीपटू तनुष कोटियन व्यतिरिक्त अष्टपैलू शम्स मुलानीने भारत ए संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शम्सने संघाच्या पहिल्या डावात महत्त्वाच्या वळणावर १८७ चेंडूत ८९ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या २९० धावांपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली, तर तनुष कोटियनने या सामन्यात एकूण ५ विकेट घेतल्या, ज्यापैकी चार विकेट्स त्याने दुसऱ्या डावात घेतल्या. याशिवाय मुंबईकर शम्स मुलानीनेही चेंडूने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि सामन्यात एकूण ४ विकेट घेतले.

हेही वाचा – Neeraj Chopra: अवघ्या एका सेंटीमीटरने हुकलं नीरज चोप्राचं जेतेपद, डायमंड लीग स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर मानावे लागले समाधान; पाहा VIDEO

Duleep Trophy 2024 Points Table: दुलीप ट्रॉफी गुणतालिका

भारत ए संघ आता हा सामना जिंकल्यानंतर ६ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर भारत बी संघ आहे, ज्यांनी आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत ज्यात त्यांनी एक सामना ७६ धावांनी जिंकला आहे तर दुसरा सामना अनिर्णित राहिला, त्यानंतर त्यांचे ९ गुण आहेत आणि त्यांचा नेट रन रेट -१.० आहे. दुसऱ्या स्थानावर भारत सी संघ आहे, ज्यांनी एक सामना जिंकला आहे आणि एक सामना अनिर्णित राहिला आणि त्यांचे देखील ९ गुण आहेत परंतु संघाचा निव्वळ धावगती -२.० आहे. सध्या, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा इंडिया डी संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे आणि आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

अंशुल कंबोज ८ विकेट्स

दुलीप ट्रॉफीतील भारत बी वि भारत सी सामन्यात अंशुल कंबोजने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हरियाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने दुलीप ट्रॉफीच्या एका डावात आठ विकेट्स घेत आश्चर्यकारक कामगिरी केली. भारत सी कडून खेळत असलेल्या अंशुल कंबोजने भारत बी विरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या दिवशी पाच विकेट्स घेतल्या, तर आज खेळाच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी त्याने सुरुवातीच्या तीन विकेट्स घेत एकूण आठ विकेट्स पूर्ण केल्या. अशाप्रकारे, देबासिस मोहंती (१०/४६) आणि अशोक दिंडा (८/१२३) यांच्यानंतर दुलीप ट्रॉफीमध्ये आठ विकेट घेणारा तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे.