Team India A Squad Announced For Tri Series: आयपीएल झाल्यानंतर ९ जूनपासून श्रीलंकेत वनडे तिरंगी मालिकेचा थरार रंगणार आहे. भारतीय अ संघ श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ संघाचा सामना करताना दिसून येणार आहे. बीसीसीआयकडून या मालिकेसाठी भारतीय अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी निवड झालेल्या खेळाडूंच्या यादीतील सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव हे वैभव सूर्यवंशीचं आहे. आयपीएल २०२६ स्पर्धेत त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. त्याची ही कामगिरी पाहता, त्याला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी केली जात होती. अखेर त्याला भारतीय अ संघात स्थान देण्यात आलं आहे.या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी तिलक वर्माकडे सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी रियान परागकडे सोपवण्यात आली आहे.
पंजाब किंग्सच्या या खेळाडूंनाही मिळाली संधी
आयपीएल २०२६ स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या थेट भारतीय अ संघात स्थान देण्यात आलं आहे. पंजाब किंग्स संघाचे स्फोटक सलामीवीर फलंदाज प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य या दोघांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. यासह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असलेला अंशूल कंबोज, यश ठाकूर आणि आयुष बदोनी, हर्ष दुबे यांच्यासह विपराज निगमचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे.
केव्हा आणि कुठे होणार तिरंगी मालिका?
या तिरंगी मालिकेचे आयोजन श्रीलंकेत केले जाणार आहे. या मालिकेत भारत अ, श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ हे तिन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या मालिकेची सुरुवात ९ जूनपासून होणार आहे. भारताचा पहिला सामना ९ जूनला श्रीलंकेविरूद्ध होणार आहे. तर ११ जूनला भारतीय अ संघाचा सामना अफगाणिस्तानविरूद्ध होणार आहे. त्यानंतर १५ आणि १७ जूनला भारतीय अ संघाचा सामना पुन्हा एकदा या दोन्ही संघाविरूद्ध होणार आङे. त्यानंतर २१ जूनला अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
या मालिकेसाठी असा आहे भारतीय अ संघ:
प्रियांश आर्य,तिलक वर्मा (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, रियान पराग (उपकर्णधार), आयुष बदोनी, निशांत सिंधु, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), विपराज निगम, यश ठाकुर, युद्धवीर सिंग, अंशूल कंबोज, अर्शद खान.
