Super Over Rule In ODI Cricket: भारत अ आणि श्रीलंका अ या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या थरारक सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने लागला. डंबुलाच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २६५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेलाही इतक्याच धावा करता आल्या. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने १६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला अवघ्या ९ धावा करता आल्या. सामना बरोबरीत सुटल्यानंतर अंपायरने सुपर ओव्हर खेळवण्यास नकार दिला होता. पण शेवटी तिलक वर्माने अंपायरला विनंती केली आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. वनडे क्रिकेटमध्ये सुपर ओव्हरचा नियम काय आहे? जाणून घ्या.

हल्ली सुपर ओव्हर म्हटलं की, सर्वांना टी-२० क्रिकेट आठवतं. कारण टी-२० क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेस सामने बरोबरीत सुटतात आणि त्यानंतर सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने लावला जातो. पण वनडेमध्ये क्वचितच असं काही पाहायला मिळतं. आधी वनडे क्रिकेटमध्ये सामना बरोबरीत सुटल्यानंतर सामना टाय घोषित केला जायचा. आयसीसी वनडे वर्ल्डकप २०१९ स्पर्धेदरम्यान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेला अंतिम सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर ट्रॉफी शेअर करण्याऐवजी सामन्याचा निकाल लागावा म्हणून सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही वनडे क्रिकेटच्या इतिहासातील पहिली सुपर ओव्हर ठरली.

पण सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटला होता. न्यूझीलंडने सुपर ओव्हरमध्ये १५ धावा केल्यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडनेही १५ धावा केल्या. सामना बरोबरीत सुटल्यानंतर, सामन्याचा निकाल कसा लागणार? म्हणून आयसीसीने बाऊंड्री काऊंटचा नियम लागू केला. इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा जास्त बाऊंड्री मारले होते. त्यामुळे इंग्लंडला जेतेपदाचा मान देण्यात आला होता. यावरुन चांगलाच वाद पेटला होता. त्यानंतर आयसीसीने बैठक घेऊन या नियमांमध्ये बदल केले होते. नव्या नियमानुसार, सामन्याचा निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाते. जर सुपर ओव्हर बरोबरीत सुटली, तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर खेळवली जाते.

भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात झालेला सामना देखील बरोबरीत सुटला होता. त्यामुळे नियमानुसार, सुपर ओव्हर खेळून सामन्याचा निकाल लावणं अपेक्षित होतं. त्यामुळेच तिलक वर्मा अंपायर्सला बराच वेळ विनंती करताना दिसून आला. हा सामना श्रीलंकेत खेळवला गेला होता. सामना बरोबरीत सुटला त्यावेळी ६ वाजले होते, सूर्यास्त झाला होता. त्यामुळे सुपर ओव्हर होणा नाही, असं अंपायर्सने सांगूनही तिलक वर्माने सुपर ओव्हर खेळवण्याची विनंती केली. ज्यावेळी श्रीलंकेचे फलंदाज फलंदाजी करत होते, त्यावेळी चेंडू स्पष्टपणे दिसत होता. पण ज्यावेळी भारतीय फलंदाज फलंदाजीला आले, त्यावेळी चेंडू स्पष्टपणे दिसत नव्हता. परिणामी भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला.