साखळी सामन्यात पराभूत झाले असले, तरी अंतिम सामन्यात मर्दुमकी गाजवत भारतीय ‘अ’ संघाने तिरंगी मालिकेवर तिरंगा फडकावत देशाला स्वातंत्र्य दिनाची छानशी भेट दिली आहे. अंतिम फेरीत भारतीय ‘अ’ संघाने ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाला ५० धावांनी पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली.
गेल्या सामन्यात दणकेबाज २४८ धावांची खेळी साकारणारा सलामीवीर शिखर धवन आणि दिनेश कार्तिक यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय ‘अ’ संघाला पहिल्यांदा फलंदाजी करताना २४३ धावा करता आल्या. धवनने ९ चौकारांच्या जोरावर ६२ धावांची, तर कार्तिकने १० चौकारांच्या जोरावर ७३ धावांची खेळी साकारली.
भारताच्या २४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा डाव १९३ धावांवर संपुष्टात आला. यष्टिरक्षक टीम पेनने (४७) संघाला सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. भारताकडून डावखुरा फिरकीपटू शहाबाज नदीमने ३४ धावांमध्ये सर्वाधिक तीन बळी मिळवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.