भारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका : प्रतिष्ठेसाठी झुंज!; भारताचा आज आफ्रिकेविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना

के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताला पहिल्या लढतीत २९७ धावांचा पाठलाग करण्यात अपयश आले.

भारताचा आज आफ्रिकेविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना

कसोटीतील नामुष्कीनंतर एकदिवसीय मालिकाही गमावणारा भारतीय संघ रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रतिष्ठा राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. या लढतीत भारतीय संघात असंख्य बदल अपेक्षित असून आफ्रिका दौऱ्याची किमान विजयी सांगता करण्यासाठी भारताचे खेळाडू उत्सुक असतील.

के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताला पहिल्या लढतीत २९७ धावांचा पाठलाग करण्यात अपयश आले. तर दुसऱ्या सामन्यात भारताने दिलेले २८८ धावांचे लक्ष्य आफ्रिकेने सात गडी राखून गाठले. त्यामुळे कसोटी मालिका १-२ असा गमावणारा भारत एकदिवसीय मालिकेतही ०-२ अशा पिछाडीवर पडला. राहुलचे नेतृत्वकौशल्य, कोहलीची फलंदाजी, मधल्या फळीची हाराकिरी, गोलंदाजांमधील सातत्य यांसारखे अनेक मुद्दे भारताच्या पराभवास कारणीभूत ठरले.

टेम्बा बव्हूमाच्या नेतृत्वाखालील आफ्रिकेने कॅगिसो रबाडाच्या अनुपस्थितीतही चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे ते तिसऱ्या लढतीतील विजयासह निर्भेळ यश संपादन करण्यासाठी उत्सुक आहेत.

ऋतुराज, सूर्यकुमार संधीच्या प्रतीक्षेत

श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर यांना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे तिसऱ्या लढतीत तरी सूर्यकुमार यादवला मधल्या फळीत खेळण्याची संधी मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल. तसेच शिखर धवनला विश्रांती देऊन महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला सलामीला खेळवता येऊ शकते. विराट कोहलीची ७१व्या शतकाची प्रतीक्षा कायम असली तरी आगामी विंडीजविरुद्धच्या मालिकांपूर्वी तो लयीत परतण्यास उत्सुक असेल. ऋषभ पंत, राहुल, शार्दूल ठाकूर यांच्यावर प्रामुख्याने फलंदाजीची भिस्त आहे.

भुवनेश्वरऐवजी सिराजला स्थान

आफ्रिकेतील खेळपट्ट्यांवर दोन फिरकीपटू खेळवण्याचा डाव भारताच्या अंगलट आला. त्यातच यजुर्वेंद्र चहलच्या तुलनेत रविचंद्रन अश्विन प्रभावहीन वाटत असल्यामुळे त्याच्याऐवजी अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवता येऊ शकतो. भुवनेश्वर कुमार सातत्याने छाप पाडण्यात अपयशी ठरत असल्याने मोहम्मद सिराजचे संघातील स्थान पक्के मानले जात आहे. जसप्रीत बुमरा आणि शार्दूल गोलंदाजीत मोलाचे योगदान देत आहेत.

’ वेळ : दुपारी २ वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर्स १, स्टार स्पोटर्स १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India africa odi series india third odi against africa today akp

Next Story
सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, मालविका अंतिम फेरीत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी