पीटीआय, नवी दिल्ली : फिरकीपटूंच्या प्रभावी माऱ्याच्या बळावर भारतीय संघाने मंगळवारी तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सात गडी आणि १८५ चेंडू राखून मात केली. हा सामना दोन्ही डाव मिळून केवळ ४६ षटके चालला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या निर्णायक सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेला २७.१ षटकांत ९९ धावांतच गुंडाळले. भारताकडून चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव (४/१८), ऑफ-स्पिनर वॉशिंग्टन सुंदर (२/१५) आणि डावखुरा फिरकीपटू शाहबाज अहमद (२/३२) या फिरकी त्रिकुटाने प्रभावी मारा केला. त्यांना मोहम्मद सिराजची (२/१७) उत्तम साथ लाभली. प्रत्युत्तरात, भारताने १०० धावांचे आव्हान १९.१ षटकांत पूर्ण करत मालिका विजय साकारला.

भारताचे प्रमुख खेळाडू ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियात असल्याने आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दुसऱ्या फळीतील खेळाडूंना स्वत: सिद्ध करण्याची संधी मिळाली. त्यांनी या संधीचा चांगला उपयोग केला. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने आपला खेळ उंचावला आणि अखेरचे दोन्ही सामने जिंकले.

अखेरच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. त्यामुळे आफ्रिकेचा संघ सुरुवातीपासून अडचणीत सापडला. आफ्रिकेचे फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरण्यात अपयशी ठरले. केवळ हेनरिक क्लासन (४२ चेंडूंत ३४), सलामीवीर यानेमन मलान (२७ चेंडूंत १५) आणि मार्को यान्सेन (१९ चेंडूंत १४) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. आफ्रिकेचा डाव अखेरीस केवळ ९९ धावांत आटोपला.

आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार शिखर धवन (१४ चेंडूंत ८) लवकर बाद झाला. तसेच गेल्या सामन्यातील अर्धशतकवीर इशान किशन (१८ चेंडूंत १०) या सामन्यात फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. युवा सलामीवीर शुभमन गिलने ५७ चेंडूंत आठ चौकारांसह ४९ धावांची खेळी करत भारताला विजयासमीप नेले. मग श्रेयस अय्यर (२३ चेंडूंत नाबाद २८) व संजू सॅमसन (४ चेंडूंत नाबाद २) यांनी उर्वरित धावा करून भारताचा विजय सुनिश्चित केला.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका : २७.१ षटकांत सर्वबाद ९९ (हेनरिक क्लासन ३४, यानेमन मलान १५; कुलदीप यादव ४/१८, वॉशिंग्टन सुंदर २/१५, शाहबाज अहमद २/३२) पराभूत वि. भारत : १९.१ षटकांत ३ बाद १०५ (शुभमन गिल ४९, श्रेयस अय्यर नाबाद २८; बोर्न फोर्टेन १/२०)

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा डाव केवळ ९९ धावांत आटोपला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेची ही नीचांकी धावसंख्या ठरली. तसेच १०० पेक्षाही कमी धावांत सर्वबाद होण्याची ही आफ्रिकेची एकूण चौथी वेळ होती.

सामनावीर : कुलदीप यादव मालिकावीर : मोहम्मद सिराज</p>