पहिल्या सामन्यात आफ्रिकेचा नऊ धावांनी विजय; मिलर, क्लासनची निर्णायक अर्धशतके

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीटीआय, लखनऊ : संजू सॅमसनच्या (६३ चेंडूंत नाबाद ८६ धावा) झुंजार खेळीनंतरही गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. आफ्रिकेने या सामन्यात नऊ धावांनी निसटता विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

लखनऊ येथे झालेल्या या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. पावसामुळे सामना निर्धारित वेळेपेक्षा दोन तास उशिराने सुरु झाला. त्यामुळे सामना ४०-४० षटकांचा करण्यात आला. भारताचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारल्यानंतर आफ्रिकेने ४ बाद २४९ अशी धावसंख्या केली. प्रत्युत्तरात भारताला ४० षटकांत ८ बाद २४० धावांपर्यंतच पोहोचता आले. अखेरच्या षटकात ३१ धावांची आवश्यकता असताना सॅमसनने तबरेझ शम्सीच्या गोलंदाजीवर तीन चौकार आणि एका षटकार मारले. मात्र, त्यानंतरही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. सॅमसनने कारकीर्दीतील सर्वोत्तम नाबाद ८६ धावांची खेळी करताना नऊ चौकार आणि तीन षटकार मारले.

तत्पूर्वी, आफ्रिकेच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. शार्दूल ठाकूरने यानेमन मलान (२२) आणि कर्णधार टेम्बा बव्हुमा (८) यांना, तर कुलदीप यादवने एडीन मार्करमला (०) माघारी पाठवले. क्विंटन डीकॉक ५४ चेंडूंत ४८ धावा करून रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यामुळे आफ्रिकेची ४ बाद ११० अशी स्थिती होती. यानंतर डेव्हिड मिलर (६३ चेंडूंत ७५) आणि हेनरिक क्लासन (६५ चेंडूंत ७४) यांनी १३९ धावांची अभेद्य भागीदारी रचत आफ्रिकेला २५० धावांसमीप नेले.

प्रत्युत्तरात भारताचे आघाडीच्या फळीतील शिखर धवन (४), शुभमन गिल (३), ऋतुराज गायकवाड (१९) आणि इशान किशन (२०) हे फलंदाज अपयशी ठरले. यानंतर मुंबईकर श्रेयस अय्यर (३७ चेंडूंत ५०) आणि सॅमसन यांनी ६७ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. श्रेयस बाद झाल्यावर सॅमसनला शार्दूलची (३१ चेंडूंत ३३) साथ लाभली. मात्र, शार्दूल माघारी परतल्यानंतर सॅमसनने एकाकी झुंज दिली.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका : ४० षटकांत ४ बाद २४९ (डेव्हिड मिलर ७५, हेनरिक क्लासन ७४; शार्दूल ठाकूर २/३५) विजयी वि. भारत : ४० षटकांत ८ बाद २४० (संजू सॅमसन ८६, श्रेयस अय्यर ५०; लुंगी एन्गिडी ३/५२)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India africa odi series sanju samson batting india lose ysh
First published on: 07-10-2022 at 01:33 IST