scorecardresearch

भारत-द.आफ्रिका ट्वेन्टी-२० मालिका : गोलंदाजांमुळे विजयी सलामी; भारताची दक्षिण आफ्रिकेवर आठ गडी राखून मात; अर्शदीप, चहरची चमक

पुनरागमनवीर अर्शदीप सिंग (३/३२), दीपक चहर (२/२४) आणि हर्षल पटेल (२/२६) या वेगवान त्रिकुटाच्या प्रभावी माऱ्यामुळे भारताने पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर आठ गडी व २० चेंडू राखून मात केली.

भारत-द.आफ्रिका ट्वेन्टी-२० मालिका : गोलंदाजांमुळे विजयी सलामी; भारताची दक्षिण आफ्रिकेवर आठ गडी राखून मात; अर्शदीप, चहरची चमक
सामनावीर : अर्शदीप सिंग

वृत्तसंस्था, तिरुवनंतपूरम : पुनरागमनवीर अर्शदीप सिंग (३/३२), दीपक चहर (२/२४) आणि हर्षल पटेल (२/२६) या वेगवान त्रिकुटाच्या प्रभावी माऱ्यामुळे भारताने पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर आठ गडी व २० चेंडू राखून मात केली. डावखुरा अर्शदीप आणि चहर यांनी सुरुवातीच्या षटकांत स्विंगचा अप्रतिम वापर करत दक्षिण आफ्रिकेला फलंदाजांना अडचणीत टाकले. त्यामुळे आफ्रिकेची तिसऱ्या षटकातच ५ बाद ९ अशी स्थिती होती. अखेर त्यांनी चाचपडत २० षटकांत ८ बाद १०६ धावांपर्यंत मजल मारली. भारताने हे लक्ष्य १६.४ षटकांत गाठत विजयी सलामी दिली.  

अर्शदीप आणि चहरच्या स्विंग गोलंदाजीपुढे आफ्रिकेच्या आघाडीच्या फळीचा निभाव लागला नाही. चहरने पहिल्याच षटकात आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बव्हुमाला (०) बाद केले. त्यानंतर अर्शदीपने वैयक्तिक पहिल्या आणि डावाच्या दुसऱ्या षटकात क्विंटन डीकॉक (१), रायली रूसो (०) आणि डेव्हिड मिलर (०) यांना माघारी धाडले. पुढच्याच षटकात चहरच्या गोलंदाजीवर युवा ट्रिस्टन स्टब्सही (०) बाद झाला. त्यामुळे आफ्रिकेची ५ बाद ९ अशी स्थिती झाली. त्यानंतर केशव महाराज (३५ चेंडूंत ४१), एडीन मार्करम (२४ चेंडूंत २५) आणि वेन पार्नेल (३७ चेंडूंत २४) यांच्या योगदानांमुळे आफ्रिकेला १०० धावांचा टप्पा ओलांडता आला.

प्रत्युत्तरात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (०) आणि विराट कोहली (३) झटपट माघारी परतले. मात्र, संयमाने फलंदाजी करणाऱ्या केएल राहुलला (५६ चेंडूंत नाबाद ५१ धावा) सूर्यकुमार यादवने (३३ चेंडूंत नाबाद ५०) आक्रमक शैलीत खेळ करत उत्तम साथ दिली. त्यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ९३ धावांची अभेद्य भागीदारी रचत भारताला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका : २० षटकांत ८ बाद १०६ (केशव महाराज ४१, एडीन मार्करम २५; अर्शदीप सिंग ३/३२, दीपक चहर २/२४) पराभूत वि. भारत : १६.४ षटकांत २ बाद ११० (केएल राहुल नाबाद ५१, सूर्यकुमार यादव नाबाद ५०; कॅगिसो रबाडा १/१६)

भारताकडून ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये एका वर्षांत सर्वाधिक धावा (७३२) करण्याचा विक्रम सूर्यकुमार यादवने आपल्या नावे केला आहे. त्याने शिखर धवनला (२०१८मध्ये ६८९ धावा) मागे टाकत या यादीत अग्रस्थान मिळवले.

मोहम्मद शमी करोनामुक्त

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या करोना चाचणीचा अहवाल बुधवारी नकारात्मक आला. दहा दिवसांपूर्वी शमीला करोनाचा संसर्ग झाला होता. ३२ वर्षीय शमीने आपल्या ‘इन्स्टाग्राम’ खात्यावरून करोनामुक्त झाल्याचे जाहीर केले. बुधवारपासून सुरू झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी शमीच्या जागी उमेश यादवाचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. शमीला सुरुवातीला १७ सप्टेंबर रोजी करोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेला मुकावे लागले होते. तसेच तो करोनातून पूर्णपणे न सावरल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही खेळणार नसल्याचे ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले होते. शमी जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळल्यानंतर क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. ऑस्ट्रेलियात पुढील महिन्यात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी त्याला राखीव म्हणून निवडण्यात आले आहे.

ट्वेन्टी-२० क्रमवारीत सूर्यकुमार दुसऱ्या स्थानी

दुबई : भारताच्या सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ट्वेन्टी-२० क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत एका स्थानाची बढती मिळाली असून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात सूर्यकुमारने ३६ चेंडूंत ६९ धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे भारताने या सामन्यासह मालिकाही जिंकली. या कामगिरीमुळे त्याने कारकीर्दीत दुसऱ्यांदा क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले. विराट कोहलीनेही आगेकूच करताना १५ वे स्थान मिळवले. फलंदाजांच्या यादीत मोहम्मद रिझवान अग्रस्थानी कायम आहे. दुसऱ्या स्थानासाठी सूर्यकुमार आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्यात स्पर्धा आहे. सूर्यकुमारच्या खात्यावर ८०१ गुण असून बाबरचे ७९९ गुण आहेत.  गोलंदाजांमध्ये अक्षर पटेल (१८व्या स्थानी) आणि यजुर्वेद्र चहल (२६व्या), तसेच वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (३७व्या) यांनीही क्रमवारीत आगेकूच केली आहे.

  • सामनावीर : अर्शदीप सिंग

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या