मुंबई : गेल्यावर्षीच्या ऑलिम्पिक आणि अलीकडेच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती. विविध खेळांमध्ये पदकांची लयलूट करत खेळाडूंनी भारताचे जागतिक क्रीडा क्षेत्रातील स्थान अधिकच भक्कम केले. आता भारताने ‘आंतरराष्ट्रीय बीच टेनिस स्पर्धे’तही पदार्पण केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईमधील मुलुंड परिसरातील उन्नत आणि विश्वजीत या सांगळे बंधूंनी थायलंड येथील पटाया शहरात नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. नामांकित रशियन जोडीसोबत झालेल्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मात्र आंतरराष्ट्रीय बीच टेनिस स्पर्धेत सर्वप्रथम भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचा मान या जोडीला मिळाला.

टेनिस स्पर्धेच्या निमित्ताने फ्रान्स दौऱ्यावर गेलेल्या विश्वजीतला बीच टेनिस पाहण्याची संधी मिळाली आणि भारतानेही बीच टेनिस स्पर्धेत सहभागी व्हायला हवे असे त्याला मनोमनी वाटू लागले. भारतात परतल्यावर विश्वजीतने उन्नतबरोबर याबाबत चर्चा केल्यानंतर इंटरनेटवरून या खेळाची सविस्तर माहिती मिळविण्यास त्यांनी सुरुवात केली. खेळातील बारकावे जाणून घेतले आणि सरावही सुरू केला. कालांतराने थायलंडमधील पटाया शहरात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बीच टेनिस स्पर्धेत सहभागी होण्याची या दोघांना संधी मिळाली.जागतिक क्रमवारीत ही जोडी ७२३ क्रमांकावर पोहोचली असून भारतात पहिल्या स्थानावर आहे. जगभरातील १५० हून अधिक देशांमध्ये बीच टेनिस खेळले जात असून थायलंडमध्ये भरविण्यात आलेल्या या स्पर्धेत इटली, अमेरिका, इंग्लंड, रूस, मेक्सिको, जपान, फ्रान्स यासह ३० हून अधिक देशांतील खेळाडू सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनअंतर्गत असलेल्या आंतरराष्ट्रीय बीच टेनिस फेडरेशनह्णने सप्टेंबर महिन्यात या स्पर्धेचे आयोजन केले होते. सांगळे बंधू स्व:खर्चाने या स्पर्धेत सहभागी झाले होते.

जगभरातील अनेक देशांमध्ये ‘बीच टेनिस’ खेळले जात असून भारतातील गोवा आणि पुडूचेरी येथे केवळ आवड म्हणून हा खेळ खेळला जातो. त्यामुळे भारत सरकारने या खेळासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्या आणि भारतात बीच टेनिसचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार करावा, अशी मागणी उन्नत व विश्वजीत यांनी केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India also made debut in international beach tennis tournament zws
First published on: 24-09-2022 at 06:44 IST