नवी दिल्ली : यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये लक्ष वेधणारा जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि पंजाबचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

आफ्रिकेविरुद्ध ९ जूनपासून मायदेशात होणाऱ्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी करण्यात आली. ‘आयपीएल’मध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना १३ सामन्यांत २१ बळी मिळवणाऱ्या उमरानने आपल्या वेगवान चेंडू टाकण्याच्या क्षमतेने राष्ट्रीय निवड समिती सदस्यांवर छाप पाडली. याचप्रमाणे हाणामारीच्या षटकांत टिच्चून गोलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जच्या अर्शदीपनेही संघात स्थान मिळवले आहे.

नियमित कर्णधार रोहित शर्मा, तारांकित फलंदाज विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी या महत्त्वाच्या खेळाडूंना ट्वेन्टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे केएल राहुलकडे कर्णधारपद, तर ऋषभ पंतकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

याचप्रमाणे गुजरात टायटन्सचे यशस्वी नेतृत्व करीत संघाला बाद फेरीपर्यंत नेणाऱ्या हार्दिक पंडय़ाने १३ सामन्यांत ४१३ धावा आणि ४ बळी अशा अष्टपैलू कामगिरीसह भारतीय संघात पुनरागमन केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून विजयवीराची भूमिका बजावणाऱ्या ३६ वर्षीय दिनेश कार्तिकलाही (२८७ धावा) भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. पंत आणि कार्तिक हे दोन यष्टिरक्षक असल्यामुळे सलामीवीर इशान किशनला फलंदाज म्हणून संघात घेतले आहे. कुलदीप यादव, रवी बिश्नोई आणि यजुर्वेद्र चहल या तीन मनगटी गोलंदाजांसह अक्षर पटेल या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाचा संघात समावेश आहे.

लखनऊ सुपर जायंट्सचे प्रतिनिधित्व करणारा उत्तर प्रदेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसिन खानच्या पदरी मात्र निराशा पडली आहे. त्याने आठ सामन्यांत १३ बळी मिळवले आहेत. तसेच सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना जवळपास चारशे धावा करणाऱ्या राहुल त्रिपाठीचीही संधी हुकली आहे.

भारताचा ट्वेन्टी-२० संघ

केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत उपकर्णधार/यष्टिरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक पंडय़ा, वेंकटेश अय्यर, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

पुजाराचे पुनरागमन

इंग्लिश कौंटी अजिंक्यपद स्पर्धेत ससेक्सकडून खेळताना दोन द्विशतके आणि दोन शतकांसह एकूण ७२० धावा करणाऱ्या ३४ वर्षीय चेतेश्वर पुजाराने १७ सदस्यीय भारतीय कसोटी संघात स्थान मिळवले आहे.

भारतीय संघ १ ते ५ जुलै या कालावधीत एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध पाचवा कसोटी सामना खेळणार आहे. गतवर्षीच्या कसोटी संघात कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. ३७ वर्षीय वृद्धिमान साहाला वर्षांच्या पूर्वार्धात वगळण्यात आल्यामुळे केएस भरतला द्वितीय यष्टिरक्षक म्हणून संघात घेतले आहे. याचप्रमाणे मिळालेल्या संधीचे सोने करणाऱ्या श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारीला संघात कायम ठेवण्यात आले आहे. रोहित, कोहली, बुमरा, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा १५ जूनला इंग्लंडला रवाना होणार आहेत.

भारताचा कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), केएस भरत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिध कृष्णा.