Virender Sehwag On Team India: आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. आज झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून सर्वात मोठा उलटफेर केला आहे. झिम्बाब्वेने हा सामना २३ धावांनी आपल्या नावावर केला. या सामन्याचा निकाल लागताच वीरेंद्र सेहवागने शेअर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या पोस्टमध्ये त्याने भारतीय संघाला विजेता घोषित केलं आहे.झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाला झिम्बाब्वेकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. १९८३ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वेने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. त्यानंतर २००७ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्यांदा पराभूत केलं.
मुख्य बाब म्हणजे जेव्हा जेव्हा झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे, तेव्हा भारताने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे.वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये भारतीय संघ यंदाही चॅम्पियन बनू शकतो, असा योगायोग सांगितला आहे. वनडे वर्ल्डकप १९८३ स्पर्धेत झिम्बाब्वेने ऑस्टेलियाला पराभूत केलं होतं. या स्पर्धेत कपिल देवच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने वेस्ट इंडिजला हरवून पहिल्यादांच जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. तर २००७ मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं.
या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पराभूत करून जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती.आता पुन्हा एकदा झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. भारतीय संघाला या स्पर्धेत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. यावेळी पुन्हा एकदा योगायोग जुळून येणार का? भारतीय संघ पुन्हा एकदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भारतीय संघाने आतापर्यंत २ वेळा टी – २० वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. २००७ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत केलं होतं. तर २०२४ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं.

