2024 Paris Olympic Day 2 Highlights: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. नेमबाज मनू भाकेर हिने भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमधील पहिले पदक कांस्या पदक मिळवून दिले आहे. यासह भारताच्या अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू हिने तिच्या पहिल्याच सामन्यात सहज विजय मिळवला आहे आणि सध्या देशातील नंबर वन पुरुष बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयनेही विजयी सलामी दिली. बॉक्सर निखत जरीननेही तिचा पहिला सामना जिंकला असून ती पुढच्या फेरीत दाखल झाली आहे. बलराज पन्वर याने रोईंगमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर रमिता जिंदाल आणि अर्जुन बाबुटा यांनी नेमबाजीमध्ये अंतिम फेरी गाठल्याने भारताच्या पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. कमल शरथ, सुमित नागल यांनी पहिल्याच फेरीत पराभूत होत निराशा केली. तर भारताच्या महिला तिरंदाजी संघाचाही प्रवास पदकाविना संपला आहे.