scorecardresearch

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका: गिल की राहुल ?

India Australia 3rd Test matchराहुल उपकर्णधार नसला तरीही, संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवला आहे.

shubhman gil
(शुभमन गिल)

भारत-ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना आजपासून;‘डब्ल्यूटीसी’ अंतिम सामन्याचे भारताचे लक्ष्य

पीटीआय, इंदूर

India vs Australia Test match भारतीय संघ बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात जेव्हा होळकर स्टेडियमवर उतरेल, तेव्हा त्यांचा प्रयत्न मालिकेत विजयी आघाडी घेण्यासह जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यातील आपले स्थान पूर्णपणे निश्चित करण्याचे असेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा संघ मालिकेत पुनरागमन करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. भारताने पहिले दोन सामने जिंकत आघाडी मिळवली असली तरीही, या सामन्यात संघ निवडीचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. चांगल्या लयीत नसलेला केएल राहुल किंवा शुभमन गिल यापैकी एकाला संघात स्थान मिळेल. त्यामुळे या दोघांपैकी कोणाला संधी मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

राहुल उपकर्णधार नसला तरीही, संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवला आहे. त्यामुळे त्याला लय मिळवण्याची आणखी एक संधी दिली जाऊ शकते. फिरकी गोलंदाजांचा वरचष्मा राहिलेल्या या मालिकेत रोहित शर्माने एकमेव शतक झळकावले आहे. भारतीय संघाला पहिल्या दिवशी फलंदाजीची संधी मिळाल्यास रोहित शिवाय चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंना धावा करण्याची संधी असेल. रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल या त्रिकुटाने गोलंदाजीत चमक दाखवण्यासह संघासाठी धावाही केल्या आहेत. या तिघांनीही धावा केल्या असल्या तरीही शीर्ष फलंदाजी फळीकडून अधिक योगदानाची अपेक्षा असेल.

भारताच्या फिरकी गोलंदाजांनी ‘स्वीप’चा फटका मारण्याची ऑस्ट्रेलियन फलंदाजांची रणनीती पूर्णपणे उधळून लावली. भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फिरकी माऱ्यासमोर पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला व संघाला त्याचा फायदाही झाला. आपल्या १००व्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने नाबाद ३१ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला असेल. इंदूर येथे संघात अनेक बदल पहायला मिळू शकतात. कर्णधार पॅट कमिन्ससह अॅश्टन अगर, जोश हेझलवुड आणि डेव्हिड वॉर्नरही दुखापतीमुळे मायदेशी परतले आहे. त्यामुळे संघाचे नेतृत्व स्टीव स्मिथ करेल.

वॉर्नरच्या अनुपस्थितीत उस्मान ख्वाजा ट्रॅव्हिस हेडसह डावाची सुरुवात करू शकतो. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ही स्मिथ आणि मार्नस लबूशेन यांच्यावर अवलंबून आहे. मिचेल स्टार्कसह अष्टपैलु कॅमेरून ग्रीन तंदुरुस्त दिसत आहेत. त्यामुळे अंतिम अकरामध्ये त्यांना संधी मिळू शकते. यासह ऑस्ट्रेलियन संघ नॅथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुनमन या तिन्ही फिरकी गोलंदाजांसह सामन्यात उतरू शकते.

वेळ : सकाळी ९.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदूी (संबंधित एचडी वाहिन्या)

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 00:20 IST
ताज्या बातम्या